“आरटीओ’तील मोडक्‍या खुर्च्यांमुळे नागरिक त्रस्त

मोशीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

मंचर – आरटीओ कार्यालयाने आपले कामकाज ऑनलाइन करूनही नागरिकांना मोशी येथील आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तेथील कार्यालयात विविध गैरसोयींचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या मोडक्‍या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरटीओतील कामकाजावर नाराजी व्यक्‍त केली आहे.

सध्या सर्वत्र खुर्चीसाठी लाथाळ्या सुरू आहेत. खुर्ची मिळविण्यासाठी सगळ्यांची चढाओढ सुरू असते. सर्वसामान्य जनतेमुळे आपल्याला खुर्ची प्राप्त झाली हे नंतर सोईस्कररित्या विसरून जातात. याचा अनुभव सर्वसामान्यांना प्रत्येक सरकारी कार्यालयात सुद्धा येतो. असाच अनुभव पिंपरी-चिंचवड आरटीओत मोशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी या तालुक्‍यांतून येणाऱ्या नागरिकांना येत आहे. तेथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागतो.

मोशी येथे चार मजली असलेल्या आरटीओच्या कार्यालयांमध्ये प्रत्येक मजल्यावर नागरिकांना बसण्यासाठी तीन आसनी खुर्च्या ठेवलेल्या आहेत; परंतु गेल्या चार महिन्यांपासून खुर्च्या मोडून पडल्या आहेत. सदर मोडक्‍या खुर्च्यावर बसता येत नसतानाही नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक बसतात. यामध्ये अपघात होऊन शारीरिक इजा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तेथील खुर्च्या मोडलेल्या असून, कार्यालयात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याशी कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते कार्यालयात नसल्याचे सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)