तहसीलच्या दिरंगाई कामकाजामुळे नागरिक त्रस्त

मंचर-आंबेगाव तालुक्‍यात सातबारा आणि इतर कागदपत्रांच्या दुरुस्तीसाठी तहसील कार्यालय घोडेगाव येथे अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वेळेत कामे होत नसल्याने नाराजीची भावना नागरिकांमध्ये पहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्‍याचे तहसील कार्यालय घोडेगाव येथे आहे. परंतु या कार्यालयात नेहमीच नागरिकांची कामांसाठी गर्दी होत आहे.ऑनलाईन सातबारा उताऱ्यामध्ये प्रचंड चुका झाल्या आहेत. चुका तलाठी भाऊसाहेब आणि संगणक चालकांकडून झाल्या असताना त्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. वारंवार हेलपाटे मारुनही कामे होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तहसील कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा होण्यासाठी तहसीलदार रमा जोशी यांनी याकडे तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.

आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. पुरवठा विभागाचे काम समाधानकारक नाही. महा-ई सेवा केंद्रात नागरिकांची अडवणूक होते. स्वस्त धान्य दुकानातून रेशन वेळेवर मिळत नाही. जमिनी खरेदी विक्री व्यवहार होऊन जमिनीचे सातबारा, आठ अ होण्यासाठी विलंब होत आहे. पुनर्वसन शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा मिळण्यासाठी किंवा जमीन विक्रीसाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. एजंटांशिवाय पारदर्शक पद्धतीने कामे होणे गरजेचे आहे. तहसील कार्यालयात आल्यानंतर तेथे कामे होण्यासाठी एजंटाची मदत घ्यावी लागते. या गंभीर बाबींकडे तहसीलदारांनी लक्ष देऊन दक्षतेने नागरिकांची सहजपणे कामे झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.