शहरात “काक’ला विषस्पर्श

नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन

चऱ्होली – सलग दोन दिवस दिघी परिसरातील बी. यू. भंडारी कॉलनी व गायकवाडनगरच्या मोकळ्या शिवारात मृत कावळे आढळून आले. करोना महामारीच्या काळात कावळ्यांचा वारंवार होणाऱ्या मृत्यूने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्नातील विषबाधेने कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वारंवार कावळ्यांचा मृत्यू होत आहे. मागे निगडी येथील स्मशानभूमी परिसरात तर गुुरुवारी (दि. 22) सांगवी परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये करोनाबरोबरच इतर आजाराची शहरात पसरतो की काय अशी धास्ती होती. परंतु दिघी येथे मृत झालेल्या कावळ्याबाबत दिघीतील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांनी त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना तात्काळ माहिती दिली. मृत झालेले कावळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून अन्नाच्या विषबाधेचे कारण स्पष्ट झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांनी माहिती दिली आहे.

दिघी येथील बी. यू. भंडारी कॉलनीमध्ये ठिकठिकाणी कावळे मृत झालेले दिसले. यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच दुसऱ्या दिवशी परत ही घटना गायकवाड नगरच्या मोकळ्या शिवारात दिसून आली. त्यामुळे ही बातमी दिघी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, आता घाबरण्याचे कारण नसल्याने दिघीकारांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

सांगवी, दिघी येथे आढळलेल्या मृत कावळ्यांचा अहवाल आला आहे. दोन्ही घटना ह्या अन्नाच्या विषबाधेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कडक उन्हाळा असल्यामुळे अन्नाची नासाडी लवकर होते. हे अन्न उघड्यावर टाकले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता व कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये किंवा तशा अफवा पसरवू नयेत.
– अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड.

सांगवीमध्ये सुद्धा मृत पावलेले कावळे आढळून आले होते. आता दिघीतसुद्धा मृत कावळे सापडले आहेत. कावळे कशामुळे मृत झाले हे तपासणी अहवाल आल्यावर कळेल. पण करोनामुळे कावळे मृत झाले याला कुठलाही आधार नाही.
– विक्रम भोसले, प्राणीमित्र चऱ्होली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.