नगर – राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते मात्र सर्वच पक्षकार लोक अदालतीत येऊ शकत नाही, म्हणून राज्य विधी सेवा प्राधिकरणाने न्याय आपल्या दारी हा उपक्रम हाती घेऊन मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून फिरते लोक अदालत ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबवत आहे. नगरमध्ये या फिरत्या लोक अदालतीचे आगमन झाल्यावर पुढील एक महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात मोबाइल व्हॅन जाणार आहे. एकमेकांमधील तंटे-वाद सामोपचाराने मिटवून न्यायालयावरील ताण कमी करण्यासाठी ठिकठिकाणी लोक अदालत शिबिरांचे आयोजन करणार आहे.
या फिरत्या लोक अदालतीच्या गाडीत न्यायाधिश, वकील व पक्षकार यांना एकत्र बसवून लोक अदालतीच्या माध्यमातून तंटे सोडविण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी या फिरत्या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश सुनिलजीत पाटील यांनी केले.
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या फिरते लोक अदालत मोबाइल व्हॅनचे नगरमध्ये आगमन झाल्यावर जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने सचिव न्या. सुनिलजीत पाटील यांनी मोबाइल व्हॅनचे स्वागत करुन पुढील महिनाभर जिल्ह्यात फिरण्यासाठी हिरवा झेंडा दाखवून कामकाजास शुभारंभ केला.
यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. भूषण बऱ्हाटे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष काकडे, केंद्र सरकारचे वकील ऍड.सुभाष भोर, पॅनेल सदस्य ऍड. शिवाजी कराळे, ऍड. विक्रम वाडेकर, ऍड. सुजाता कुमार, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक पी. डी.ताकसाळे, एन. बी. देशमुख, योगेश हळगांवकर, विराज ठाकूर आदींसह वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.