नगर – सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन बुधवारी (31 ऑगस्ट) होणार आहे. गणेशाच्या आगमनाची तयारी घरोघरी सुरू आहे. बाजारपेठेत आकर्षक मखर, विद्यूत रोषणाई साहित्याची रेलचेल दिसत आहे. गणेश मूर्तींचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत.
शहरात मूर्ती कारखान्यांची संख्या मोठी आहे. शहरातील गणेश मूर्ती परराज्यातही पाठविल्या जातात. आता दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्याने लोकांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. शनिवार व रविवारी सुटी असल्याने लोकांन बाजारपेठेत गर्दी केली होती. कापड बाजार, चितळे रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, केडगाव या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी दिसत होती. बाजारपेठेत आकर्षक मखर, मुकूट, चमकदार झिरमाळा, पताका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी नगरकर जशी जय्यत तयारी करत आहेत तसेच प्रशासनानेही गणेशोत्सवासाठी तयारी सुरू केली आहे. करोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. महापालिका, पोलीस प्रशासनाकडून गणोशोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे.
इको-फ्रेंडली गणेश मूर्तींना मागणी वाढली
-यावेळी शाडू मातीच्या मूर्तींचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पर्यावरणाबाबत जनजागृती होत असल्याने शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींनाही मागणी वाढल्याचे दिसत आहे. शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे दर 550 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. यंदा या गणेश मूर्तींनाही मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सवलतीच्या दरात मिळणार वीज
-येत्या 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या काळात महावितरणकडून गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या 100 युनिटसाठी केवळ 4 रूपये 71 पैसे प्रति युनिट, 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 69 पैसे प्रति युनिट, 301 ते 500 प्रती युनिट वीज वापरासाठी 11 रुपये 72 पैसे प्रति युनिट आणि 500 युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी 13 रुपये 21 पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे.