रताळी खरेदीस नागरिकांची पसंती

पुणे -आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर रताळीला मागणी वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील उंदरगाव, मांजरगावसह इतर काही गावांतून मार्केट यार्डातील तरकारी विभागात आवक होत आहे. घाऊक बाजारातील भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. आवक मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे.

बाजारात तीन ते साडेतीन हजार पोतींची आवक झाली असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली. मागील वर्षी करोनामुळे रताळींची विक्री पूर्णपणे घटली होती. यावर्षी मात्र मागणी असल्याचे दिसून येत आहे.
आषाढी एकादशी मंगळवारी (दि.20 जुलै) आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारपासूनच (दि.15) रताळांची आवक सुरू झाली आहे. करमाळा भागातील रताळांना दहा किलोस 300 ते 350 रुपये भाव मिळत आहे. अद्याप कर्नाटक भागातील रताळींची आवक झालेली नाही. करमाळा भागातून दाखल झालेली रताळ गावरान आणि आकाराने लहान असतात. त्याची चव गोड असते. त्यामुळे या रताळांना मोठी मागणी असते.

अर्धा एकर शेतामध्ये रताळीची लागवड केली आहे. नेहमीच्या तुलनेत यावर्षी चांगले उत्पादन निघाले आहे. सहा महिन्यांचे पीक आहे. बरोबर आषाढी एकादशीचा विचार करून पीक बाजारात येईल, त्यानुसार लागवड करावी लागते. यावर्षी पाऊस सुरू असल्यामुळे शेतातून माल काढण्यास त्रास झाला. करोना परिस्थितीत मिळणारा भाव समाधानकारक आहे.
– श्रीरंग चौधरी, शेतकरी, मांजरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.