जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार
पुणे – “करोना’ विषाणुमुळे होत असलेल्या “कोविड-19′ या साथीच्या आजाराचा मुकाबला करताना सर्वसामान्यांनी जी काळजी घ्यायची आहे, त्यामध्ये तोंडाला मास्क बांधण्याइतकाच महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे दोन्ही हातांसाठी हातमोजे (ग्लोव्हज्) वापरण्याचा.
यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने एक मार्गदर्शक प्रणाली जारी केली असून, त्यामध्ये म्हटल्यानुसार, “कोव्हिड-19’चा प्रसार थेट हवेतून होत नसल्याने (एअरबोर्न डिसीज नसल्याने) ग्लोव्हज् वापरणे अधिक श्रेयस्कर आहे. जे लोक कोव्हिड-19 पॉझिटीव्ह आहेत, अशांच्या थेट संपर्कात आल्याने या रोगाचा प्रसार प्रामुख्याने होतो. हे टाळण्यासाठी मास्क आणि ग्लोव्हज वापरणे सर्वात सुरक्षित मानले गेले आहे.
क़ोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हातांचे आरोग्य सर्वात चांगले राखायचे आहे. वरचेवर कुणालाही आपले हात खराब असल्याचे कदाचित दिसून येणार नाही. तरिही प्रत्येकाने अधुनमधून आपले हात अल्कोहोलचा समावेश असलेल्या हॅंड रब सोल्युशन किंवा साबणाने सातत्याने धुणे हे सर्वाधिक सुरक्षित मानले गेले आहे. तसेच या हातांवर विषाणुचे आक्रमण टाळण्यासाठी ग्लोव्हज् वापरणे आवश्यक आहे. हाताची नखे काढलेली असणे, हाताला-बोटांना जखम नसणे तसेच अचानक खोकला किंवा शिंक आली तर तो स्त्राव ओंजळीत न घेता, टिश्यु पेपरवर घेऊन, तो टिश्यु पेपर तातडीने नाहीसा करणे, असे उपाय जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेले आहेत. तसेच शक्यतो प्रत्येकानेच आपले डोळे, नाक आणि तोंडाला सातत्याने हाताचा स्पर्श टाळणे श्रेयस्कर मानले गेले आहे. शिवाय ग्लोव्हज् वापरणाऱ्यांनीही थोड्या-थोड्या वेळाने हात धुणे अनिवार्य आहेच, हे विसरु नये.
ज्यांना श्वसनाचे विकार आहेत (सायनस, सर्दी) अशांनी ग्लोव्हज्च्या बरोबरीने अनिवार्यपणे मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. ज्यांना असे श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्यापसून इतरांनी जास्त अंतर ठेऊन वावरायचे आहे. सोशल डिस्टंसिंगमध्ये साधारण एक मीटर इतके अंतर प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये सुचवले असले, तरी श्वसनविकार असलेल्या व्यक्तीपासून दीड ते दोन मीटर्स अंतर ठेवणे गरजेचे आहे.
कोणी काय वापरायचे?
बाधित देशांतून आलेले माल उतरवणारे लोक – बाधित भागातून/देशांतून आलेला माल, पार्सल्स उतरवताना मास्क अथवा ग्लोव्हज् वापरण्याची गरज नाही, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. अशा सामानाच्या हाताळणीमधून कोव्हिड-19 चे विषाणु पसरत नाहीत. मात्र, या कामगारांनी थोड्या-थोड्या वेळाने हात साबणाने धूत रहाणे गरजेचे आहे.
थेट रुग्णाच्या खोलीत सेवा पुरवणारे कर्मचारी – मेडिकल मास्क, गाऊन, ग्लोव्हज् आणि गॉगल किंवा चेहरा झाकणे
रुग्णांना एअरोसोल सेवा देणारे तज्ज्ञ – रेस्पिरेटर एन95, किंवा एफएफपी2, गाऊन, ग्लोव्हज्, ऍप्रन, गॉगल
रुग्णांना भेटणारे नातेवाईक – मेडिकल मास्क, गाऊन, ग्लोव्हज्
लॅब टेक्निशियन – मेडिकल मास्क, गाऊन, ग्लोव्हज्
स्क्रीनिंग परिसराची स्वच्छता – मेडिकल मास्क, गाऊन, हेवि ड्युटी ग्लोव्हज्, उंच बूट, डोळ्यांसाठी गॉगल्स
ऍम्ब्युलन्स कर्मचारी – मेडिकल मास्क, गाऊन, ग्लोव्हज्, डोळ्यांसाठी गॉगल्स
मीडिया पर्सोनेल – रुग्णाची मुलाखत घेताना झूम लेन्स वापरावी. कॅमेरा घेऊन रुग्णाच्या जवळ न जाता बोलावे. मेडिकल मास्क आणि ग्लोव्हज् आवश्यक