पळसदेव -देशात करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे, कंपन्या, मॉल बंद आहेत. मात्र, असे असतनाही खचून न जात केवळ एक एकर आंब्याच्या बागेतून साडेबारा लाखाचे उत्पादन बीजवाडी (ता. इंदापूर) येथील स्वाती कोकणे व आशा कोकणे यांनी मिळवले आहे.
स्वाती कोकणे व अनिता कोकणे यांनी कृषी मंडल अधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय अनुदानावर आवलंबून न राहता एक एकर शेतात सुमारे 1080 विविध आंब्याच्या रोपांची लागवड केली आणि त्यातून सध्या चौथ्या वर्षी लाखांचे उत्पन्न मिळवले.
देशात लॉकडाऊन लागू होण्याआधी कोकणे यांनी केशर व हापूस आंबा इंग्लंडला पाठवला होता. सध्या बंदमुळे या भागात व्यापाऱ्यांना 250 रुपये दराने या आंब्याची विक्री केली यातून सुमारे एकूण साडेबारा लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याचे स्वाती कोकणे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
यामध्ये एक वर्षाचा उत्पन्न खर्च हा केवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये आला. सध्या कोकणे यांच्या बागेत हापूस, केशर, किंग्स्टन, राजापुरी, तोतापुरी, रत्ना, नीलम, वनराज अशी 18 प्रकारच्या आंब्यांच्या जातीची झाडे पाहावयास मिळतात.
कोकण सोडून इतर भागात चांगल्या दर्जाचा हापूस आणि केशर आंबा खायला मिळत नाही, त्यामुळे या भागात आशा प्रकारे शेतकऱ्यांनी आंब्याची लागवड करून व्यापारी पद्धतीने उत्पन्न घेतल्यास यातून शाश्वत उत्पन्न या भागातील शेतकऱ्यांना मिळू शकते, असे कृषी मंडळ अधिकारी बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले.