माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन : एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याचा विश्वास
पिंपरी – नागरिकत्व संशोधन कायदा हा देशवासीयांसाठी महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याला नाहक विरोध होत असून सध्या सुरू असलेले आंदोलन हे द्वेषातून केले जात आहे. या आंदोलकांना शहरी नक्षलवाद्यांसह अन्य फुटीरवादी शक्तींची साथ मिळत आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याचा विश्वास माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
पिंपरी येथील बी. टी. आडवाणी धर्मशाळेमध्ये सदर कायद्याच्या समर्थनार्थ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद तावडे बोलत होते. कार्यक्रमास खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक संदीप वाघेरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, उमाताई खापरे, राजेश पिल्ले, ज्योतिका मलकानी, रवी अनासपुरे, जयदेव डेंब्रा, दिलीप मदनाणी, मोहित बुलाणी, शुभम शिंदे, श्रीकांत वाघेरे व इतर मान्यवर उपस्थित होते. तर शिबिरासाठी पिंपरी परिसरातील सिंधी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
पुढे बोलताना तावडे म्हणाले, भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातील हिंदूंची संख्या 15 टक्के होती ती आता दीड टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तानासह इतर देशातील हिंदू भारतात सुरक्षित वातावरण असल्यामुळे आले आहेत. त्यांनी भारताचा आश्रय घेतलेला आहे. तसेच पाकिस्तानातील हिंदूंचे पूर्वज शेकडो वर्षांपासून भारतातच राहतात. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून धर्माच्या नावाने झालेल्या छळामुळे, पिळवणुकीमुळे आणि अत्याचारामुळे भारताच्या आश्रयाला आलेल्या गैरमुस्लिम विस्थापितांना या कायद्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वातंत्र्यापासून आणि त्यानंतरही भारतात आश्रिताचे जगणे जगण्याचा त्यांच्यावरील कलंक संपुष्टात येणार आहे. तसेच सर्व प्रकारचे शासकीय फायदेही या नागरिकांच्या पदरी पडणार आहेत.
परंतु कॉंग्रेस या सर्व गोष्टीं विषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण करून भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे, आपण सर्वांनी एक होवून अशा प्रवृत्तींवर मात करण्याची वेळ आली आहे. सिंधी बांधवांनी या कायद्याला पाठिंबा देत या कायद्याचे महत्त्व घरोघरी पोहोचविले पाहिजे, असेही तावडे म्हणाले. या मेळाव्यानंतर विनोद तावडे यांच्या नेतृत्वात नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ पिंपरी कॅम्प परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यानंतर पिंपरीगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्तावित नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेविका वैशाली खाड्ये यांनी केले.