पुणे, प्रभात वृत्तसेवा} – कसबा विधानसभा मतदारसंघातील जुन्या वाड्यांचा प्रश्न, दुरुस्तीला बंदी या पार्श्वभूमीवर कसब्यातील एक लाख नागरिकांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे.
यासाठी शनिवारवाडा कृती समिती स्थापन केली असून, त्याच्या प्रमुख अनूपमा मुजुमदार यांनी हा इशारा दिला आहे.
ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे.
परिणामी, शनिवारवाडा आणि पाताळेश्वर परिसरातील जुन्या वाड्यांची आणि काही इमारतींची पुनर्निर्मिती थांबली आहे.
केंद्र सरकारच्या जाचक नियमामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आहेत. खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप कृती समितीने केला आहे.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषण करण्याला पोलीस परवानगी देत नाहीत. हतबल नागरिक, सरकारचे दुर्लक्ष, महापालिकेचा कारभार यामध्ये येथील नागरिकांची कोंडी होत आहे, असे मुजुमदार या वेळी म्हणाल्या.
शनिवारवाड्याच्या भिंतींना नवीन बांधकामामुळे काही तोटा होणार नाही, असे दिसून येत आहे. तरीही येथे बांधकामाला परवानगी दिली जात नाही.
येथील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका या अगदी प्राथमिक सुविधांपासून देखील वंचित आहेत. – अनूपमा मुजुमदार, शनिवारवाडा कृती समिती