आरोग्यदायी शहाळ्यांची नागरिकांना गोडी

वाढत्या उन्हाचा परिणाम, दरही वाढले

पिंपरी – यावर्षी पारा मार्च महिन्यातच 40 अंशाच्या पुढे गेला आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी थंडावा देणारी शीतपेये, ज्यूस, फळांचे स्टॉल जागोजागी उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक नागरिक शरिरास अपायकारक ठरणाऱ्या “कोल्ड्रिंक’पेक्षा नैसर्गिक व कुठलीही बाह्य रासायनिक प्रक्रिया न केलेल्या शहाळ्यांना पसंदी देत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमध्ये दिवसेंनदिवस वाढ होत असल्याने उन्हाळ्यात शहाळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलवर दिवसाकाठी आठशे ते नऊशे शहाळ्यांची विक्री होत आहे. त्यामुळे, नागरिकांना या उन्हाळ्यात शहाळ्यांची चांगलीच गोडी लागल्याचे दिसत आहे.

गेल्या महिन्याभरापासून तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, रुमाल, गॉगल्स अशा साहित्यांचा अधार घेत आहेत. त्याच बरोबरच दुपारी थंडगार ज्यूस, ऊसाचा रस व नारळपाणी पिण्यावर भर देत आहेत. उन्हाळ्याची सुरुवात झाल्यापासूनच शहरात ठिक-ठिकाणी लिंबू सरबत, ताक विक्रेते ठिक-ठिकाणी दिसत आहेत. सोबतच वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाटलीबंद कोल्ड्रिंक्‍सनेही हॉटेल, रेस्टॉरेंट, लहान-मोठे दुकानदार यांचे फ्रीज तुडुंब भरले आहेत. मात्र, सध्या आरोग्यास लाभदायक ठरत असलेल्या शहाळ्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. डॉक्‍टरांच्या मते कुठल्याही रुग्णासाठी शहाळ्याचे पाणी आरोग्यवर्धक ठरते. उन्हाळ्यात वेगळ्या कुठल्या फळांचा रस घेण्यापेक्षा दररोज एक शहाळे पिल्यास ते शरीरासाठी हितकारक मानले जाते.

शहाळ्यामध्ये पोटॅशिअम व मिनरल्सचे प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीरात कमी झालेले पाण्याचे प्रमाण वाढवण्यास शहाळे मदत करते. त्यामुळे, शहाळ्यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला तर शहरात केरळ, मदुराई तसेच कोकणातून शहाळ्यांचा पुरवठा होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर कुठेतरी सावली पकडून बसलेले विक्रेते दिवसाला 800 ते 900 शहाळ्यांची विक्री करत आहे. यंदा शहाळ्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यात देशभरात केरळमधील शहाळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आवकही काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शहाळ्यांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. सध्या बाजारात शहाळ्यांची 25 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत शहाळे उपलब्ध आहेत. दर वाढत असले तरी आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या शहाळ्यांची मागणी दिवसें-दिवस वाढत चालली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.