राहात्यात पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा 

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कारवाईची केली मागणी

राहाता – शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, या गुन्ह्याची चौकशी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, या मागणीसाठी राहाता शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. यावेळी नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोकांनी एकत्रित येऊन निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाचे रूपांतर पोलीस ठाण्यासमोर निषेध सभेत झाले. याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ म्हणाले, राहाता शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार, रोडरोमिओंवर पोलिसांचा वचक राहिला नाही. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. तसेच मुलींची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असून, पोलिसांनी आपला वचक निर्माण केला नाही, तर कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्या शिवाय राहणार नाही. पोलिसांनी स्वतःची भूमिका बदलली पाहिजे.

मोहनराव सदाफळ म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार हा निंदणीय व निषेधार्थ असून, अशा मनोविकृत आरोपीला पोलिसांनी कठोरात कठोर शासन करण्याची गरज आहे. तसेच अल्पवयीन बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढला असून, या निमित्ताने आम्ही संबंधित आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची मागणी करत आहोत. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकाराची चौकशी करावी. त्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण गांधी म्हणाले, शहरात अनेक ठिकाणी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होत असून, काही उपनगरांत खुलेआम महिलांवर अश्‍लिल शेरेबाजी होत आहे. तसेच पोलीस ठाण्यासमोर साईभक्तांची वाहन तपासणीच्या नावाखाली अडवणूक केली जाते. त्यामुळे मुलींची व महाविद्यालयीन युवतींची सुरक्षितता धोक्‍यात येऊ पाहत असून, त्यासाठी पोलिसांनी दामिनी पथक तयार करणे गरजेचे आहे. माजी नगराध्यक्ष साहेबराव निदाने यांनी गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीचे लोक खुलेआम पोलिसांबरोबर फिरताना दिसतात.

या लोकांची जर पोलिसांशी मैत्री होत असेल, तर कायदा सुव्यवस्थेचे अपेक्षा कोणाकडून करायची, असा सवाल केला. मनसेचे विजय मोगले, रामनाथ सदाफळ, राजेश लुटे, माजी नगराध्यक्ष साहेबराव निदाने, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, प्रदीप बनसोडे आदींची भाषणे झाली यावेळी निवेदन पोलीस निरीक्षक अरुण परदेशी व उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी स्वीकारले. या घटनेत आरोपीला कुठल्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही. कठोरात कठोर शासन होईल, अशी दक्षता घेऊ, असे आश्‍वासन यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाबळे, मुन्ना शाह, सोपान सदाफळ, गंगाधर बोठे यांच्यासह सर्व पक्षीय व सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)