पुणे : थंडीला सुरवात होताच पर्यटक फिरायला जाण्याचे नियोजन करतात. त्यांच्यासाठी पीएमपीने खास वातानूकुलित पर्यटन बससेवा सुरू केली आहे. त्यातच मार्गशीर्ष महिन्यातही देवदर्शनासाठी नागरिक जवळच्या तीर्थक्षेत्रांना गर्दी करतात. त्यामुळे पीएमपीने सात ठिकाणी पर्यटन बससेवा सुरू केली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
डिसेंबरमध्ये थंडीला सुरुवात होताच अनेक पर्यटक कोकणाची वाट धरतात. मात्र, सुट्टी एक दिवसाची त्यात एवढा प्रवास करण्यापेक्षा पुणे शहराच्या जवळपासच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक धरणक्षेत्र, डोंगरमाथा यासह तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जातात. मात्र, या वेळी स्वस्तात, आरामदायी आणि ग्रुपबरोबर धमाल मस्ती करत प्रवास आणि पर्यटनाचा आनंद घ्यायचा असतो. त्याचाच सर्वांगीण विचार करून पीएमपीने सुट्ट्यांच्या दिवशी आठ मार्गांवर माफक दरात पर्यटन सेवा सुरू केली आहे.
आठवड्याच्या प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही पर्यटन बससेवा सुरू असते. त्यासाठी स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येकी ५०० रुपये तिकिट दर असून, प्रवाशांना माहिती देण्यासाठी या बसमध्ये गाइड सेवकाची नेमणूक केलेली असते. ज्या दिवशी बुकिंग केले त्या दिवशी सदर प्रवास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहोचल्यानंतर राहत्या घरापर्यंत बुकिंग केलेल्या तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधूनही प्रवास करता येऊ शकतो.
पर्यटन बससेवेचे मार्ग…
मार्ग क्र. १ : हडपसर, मोरगाव, जेजूरी, सासवड, हडपसर
मार्ग क्र. २ : हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर
मार्ग क्र. ३ : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन
मार्ग क्र. ४ : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन
मार्ग क्र. ५ : पुणे स्टेशन, पूलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन
मार्ग क्र. ६ : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर, वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर, रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन
मार्ग क्र. ७ : भक्ती- शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी, देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती-शक्ती निगडी
येथे करा बुकिंग…
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवन या पास केंद्रांवर. बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे.