‘फुलेवाडा’ नागरिकांसाठी प्रेरणादायी

पुण्याच्या ऐतिहासिक वारशांमध्ये भर घालणारे “फुलेवाडा’ हे ठिकाण नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे वास्तव्य असणाऱ्या ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा प्राप्त झाला आहे. सुरुवातीला काहीकाळ या ठिकाणी वसतिगृह चालविण्यात येत होते. महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे आणि अवशेष अधिनियम 1960 नुसार हा वाडा 1972 मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वास्तू संग्रहालय विभागामार्फत मूळ स्वरूपात जतन करण्यात आले आहे.

वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुळशी वृंदावन लक्ष वेधून घेते. त्याचबरोबर समोर दिसणारा कौलारू वाडा प्रत्येकाच्या मनात इतिहास जागवतो. प्रशस्त ओसरी, तीन दालने आणि अंगणात असणारी विहीर असे वाड्याचे अनोखे रूप आहे. वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पुतळे बसविले आहेत. वाड्यात साकारलेल्या स्मारक संग्रहालयात रेखाटलेल्या चित्रांतून महात्मा फुले यांचे शिक्षण, स्त्रियांची पहिली शाळा, सभेतील भाषणे आदी जीवनपट रेखाटला आहे. वाड्याच्या परिसरामध्ये कोरलेली चित्रे देखील फुले यांचे कार्य उलगडतात. त्यांच्या मोठ्या पूर्णाकृती तैलचित्रासमोर प्रत्येक जण नतमस्तक होतो. त्याचबरोबर वाड्यामध्ये फुले यांनी लिहिलेल्या “सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे मुखपृष्ठ लावण्यात आले आहे.

सन 1891 साली प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत बारा आणे होती. गंज पेठ अर्थात महात्मा फुले पेठेत असणारा, “समता भूमी’ अशी ओळख असणारा हा वाडा सोमवार आणि शासकीय सुट्टी व्यतिरिक्‍त सकाळी साडेदहा ते साडेपाच या वेळात पाहता येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.