“रोड रॉबरी’ रोखण्यासाठी नागरिकांचाच पुढाकार

पर्स चोरणाऱ्या दोघांना पकडले एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी
वाढत्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश

पिंपरी – रस्त्याने पायी चाललेल्या एका महिलेची पर्स हिसकावून पळ काढणाऱ्या दोन चोरट्यांना नागरिकांनीच पाठलाग करुन पकडले, तर एकजण पर्स घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 27) मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील ओपन लॉन्स परिसरातील रस्त्यावर घडली. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या “रोड रॉबरी’ रोखण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेतल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

राहुल उत्तम इंगवले (वय 18, रा. आईजी स्वीटमार्ट, भारत माता चौक, आझाद कॉलनी, काळेवाडी) आणि विकी नागेश वाघमारे (वय 18, रा. अजिंक्‍य कॉलणी, सदगुरु सुपर मार्केट गल्ली, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार साहिल उर्फ खत्री हा पर्ससह फरार झाला आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी महिला या त्यांच्या बहिणीला भेटून पिंपरी येथील आपल्या घरी पायी जात होत्या. दरम्यान त्या ओपन लॉन्स शेजारील रस्त्यावर आल्या असता त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या ऍक्‍टिव्हा दुचाकीवरुन आलेल्या राहुल, विकी आणि साहिल या तिघांनी महिलेच्या हातातील पर्स हिसका मारुन चोरुन नेली. यावेळी फिर्यादी महिलेने आरडा-ओरड केल्याने स्थानिक नागरिकांनी पाठलाग करुन चोरट्यांना पकडले. यामध्ये, राहुल आणि विकी हे दोघे नागरिकांच्या हाताला सापडले. मात्र त्यांचा साथीदार साहिल उर्फ खत्री हा पर्स घेऊन फरार झाला. पर्समध्ये अडीच हजारांची रोख होती. पकडलेल्या दोन्ही चोरट्यांनी नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी पोलीस फरार साहिलचा शोध घेत आहेत.

मागील काही दिवसांमध्ये पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 18 ते 22 वयोगटातील चोरटे दुचाकीवरुन येऊन नागरिकांना लुटत आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर घराबाहेर पायी चालत जाणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. असाच प्रकार पिंपरी येथे होताना स्थानिक नागरिकांनीच सतर्कता दाखवून चोरट्यांना पकडले. त्यामुळे, नागरिकांनीच आता अशा चोरट्यांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)