मांगूरच्या तळ्याविरोधात नागरिक एकवटले

नीलकंठ मोहिते

इंदापूर तालुक्‍यातील दहा गावांत शेतकरी आंदोलनाच्या तयारीत : उजनीत गोडवा मासा संपुष्टात

खासदार, आमदार तक्रारी ऐकून दमले

यासंदर्भात इंदापूर पोलीस स्टेशन, खडकवासला जलसंपदा विभाग, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, मत्स्य आयुक्‍त पुणे, आमदार दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही. कारवाई न झाल्याने बेकायदेशीर तळी जोपासली जात आहेत. जलसंपदा विभाग व मत्स्य आयुक्‍तांनी वेळोवेळी कारवाई करण्यासाठी नोटीसा दिल्या आहेत. मात्र, कारवाई झाली नाही. उलट व्यवसाय करण्यासाठी पुणे, मुंबई, दादर व नाशिक, दिल्ली बाजारपेठेत हा मांगूर मासा पाठवला जात आहे. मांगूर माशांची बेकायदेशीर तळी बंद झाली नाहीत तर नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे. प्रशासनाने उत्पादनावर बंदी घातलेला मासा विक्रीसाठी जात असेल तर अधिकाऱ्यांची गांधारी भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून होत आहे. ही बेकायदा तळी उद्‌ध्वस्त करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील उजनी जलाशय भागातील भीमा नदीच्या पात्रालगतच शासनाने बंदी घातलेल्या मांगूर माशांची शेकडो तळ्यांची उभारणी करून लाखो रुपये कमवत आहेत. कालठण, शहा, पडस्थळ भागातील तळ्यामुळे साथीच्या आजाराने थैमान घातले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या तळ्याविरोधात नागरिक एकवटले आहेत.

मांगूर मासा उजनी जलाशय परिसरातील हटविण्यासाठी सहा महिन्यांपासून नागरिकांनी निवेदने दिली आहेत. तक्रारी केल्या जात आहे. परंतु आतापर्यंत ठोस कारवाई झाली नाही. ही उद्‌ध्वस्त करा; अन्यथा दहा गावांतील नागरिक आणि शेतकऱ्यांना संघटित करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे यांनी दिला आहे.

कालठण नं 1, कलठण नं 2, कळाशी, आगोती, चांडगाव, पळसदेव, डाळज, वांगी, कांदलगाव, चांडगाव, भादलवाडी, भिगवण, सुगाव, पडस्थळ, शहा, आजोती, पिंपरी गावच्या हद्दीतील शेतात खासगी शेतकऱ्यांनी बेकायदेशीर मांगुर माशांची तळी केलेली आहे. हा मासा पोसण्यासाठी खाद्यासाठी वेस्टेज पदार्थ वापरले जात आहेत. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात दुर्गंधी निर्माण झाली आहे. कर्जत व माढा तालुक्‍यातील हद्दीत शेतकऱ्यांनी राजरोसपणे हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पात्रातील पाणी दूषित करून टाकले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात हजारो मांगूर माशांची तळी आहेत. हा मासा शरीराला अपायकारक आहे. हा मासा खाण्यात आला तर अनेक आजार होतात. यामध्ये हदयरोग, कर्करोगसारखे गंभीर आजाराला नागरिकांना बळी पडावे लागत आहे.

मांगूर माश्‍यांचे प्रमुख खाद्य मासांहार आहे. त्यामुळे मोठे मटण, कोंबड्या व रोगराईने मरण पावलेली जनावरे वेळप्रसंगी घातली जातात. माशाच्या तळ्यामुळे रोगराईने गावे ग्रासली आहेत. जेथे तळी आहेत. त्याठिकाणी मजूर कामाला जात नाहीत. उग्र वासाने थैमान घातले आहे. 50 टक्‍के नागरिकांना आजार जडले आहेत. तळ्याच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. शेळया- मेंढया खाण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांचा बचाव करण्यासाठी घरातील मोठ्या लोकांना खडा पहारा द्यावा लागत आहे. या तळ्यातील दूषित आणि दुर्गंधीयुक्‍त पाणी चार दिवसाला थेट उजनी जलाशयात सोडले जात आहे. त्यामुळे उजनीचे पाणी दूषित झाले आहे. परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना दूषित पाण्याने व्यापल्या आहेत. गाव सोडून राहण्यासाठी बाहेर जायचे का, अशी मानसिकता स्थानिक नागरिकांची झाली आहे.

उजनी जलाशय परिसरात विषयुक्‍त मासा
उजनी जलाशयात मांगूर मासा टॅंक फुटल्यावर उजनी जलाशयात दाखल झाल्याने गोडवा मासा कानिशा, रघू, कटला, गुगुळी, शिंगटा, असे गोडवे मासे मृत झाले आहेत. मासा खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उजनी जलाशयात आता विषारी माशांची पैदास केली जात आहे. हा मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर देखील एक तासभर जिंवत राहतो. त्यामुळे जिवंत मासा म्हणून ग्राहक अभ्यास न करता खरेदी करतात. ही ग्राहकांच्या दृष्टीने धोक्‍याची घंटा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.