विदेशी कांद्याला नागरिकांची नापसंती

तुर्कस्थानमधील कांदा बाजारपेठेत : अपेक्षित खरेदी नसल्याने कांदा पडून

पिंपरी – बाजारपेठेत सध्या कांद्याच्या दराने उच्चांकी भाव गाठले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तर पुणे शहरापेक्षाही जास्त किंमतीने कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे, कांदा सर्वसामान्य नागरिकांना रडवत आहेत. अशा स्थितीत नागरिकांना स्वस्त दरामध्ये कांदा मिळावा म्हणून व्यापाऱ्यांनी पिंपरी बाजारपेठेमध्ये तुर्कस्थान मधील कांदा मागवला आहे. मात्र, या विदेशी कांद्याला चव नसल्यामुळे नागरिकांनी कांद्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे विक्रेते मात्र हैराण झाल्याचे दिसत आहे.

कांद्याची आवक अत्यंत कमी झाल्याने सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये कांद्याचे दर पुण्यातील बाजारपेठेपेक्षाही जास्त आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कांद्याचा दर 100 ते 150 रुपयांपर्यंत गेला आहे. दर वाढल्यामुळे कांद्याची विक्रीवरही मोठा परिणाम झाला. यावर मार्ग काढण्यासाठी मागील आठवड्यात पिंपरी येथील व्यापाऱ्यांनी देशी कांद्याच्या तुलनेत स्वस्त असलेल्या तुर्कस्थान येथील कांद्याची आवक केली. या कांद्याचा दर प्रतिकिलो 70 ते 80 रुपये किलो आहे. देशी कांद्याच्या तुलनेत विदेशी कांद्याचा दर कमी असला तरी या कांद्याला चव नसल्यची तसेच आकाराने मोठा असलेला कांदा चांगल्या प्रतीचा नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत.

विदेशी कांद्याचे दर सारखेच
देशी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे सरकारने विदेशी कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तुर्कस्थान, इजिप्त येथील कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याचा दर आणि देशी कांद्याच्या दरामध्ये अधिक तफावत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.