प्राधिकरण कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

  • 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम

पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांना अनुसरून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश न देता ई-व्हिजिटर पद्धत कार्यान्वित करावी, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरून प्राधिकरण कार्यालयामध्ये नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार 30 एप्रिलपर्यंत हा प्रवेश बंद असणार आहे, अशी माहिती उप-मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यांनी दिली.

नागरिकांना प्रवेश बंद असला तरी नागरिकांकडून येणारे टपाल आवक-जावक रजिस्टरमध्ये स्वीकारले जाणार आहे. त्याशिवाय, नागरिकांना ई-मेलद्वारे देखील प्राधिकरण कार्यालयाशी संबंधित कामकाज करता येणार आहे. तसेच, नागरिक कार्यालयीन वेळेत प्राधिकरणाच्या कार्यालयात दूरध्वनीद्वारे देखील संपर्क साधू शकतात. संपर्कासाठी दूरध्वनी : 020-27166000. ई-मेल : [email protected] किंवा [email protected]

निम्म्याच कर्मचाऱ्यांची उपस्थिती
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील कामकाज मंगळवारपासून (दि. 6) 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे. प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख दररोज कामावर हजर राहतील. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करून त्यांना एक दिवसाआड कामावर बोलावले जाणार आहे. प्राधिकरण सेवेतील 50 आणि कंत्राटी तत्त्वावरील 25 कर्मचारी सध्या प्राधिकरणात कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना काम करताना पुरेसे सोशल डिस्टंसिंग ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेवणाच्या व इतर वेळी एकत्र येऊन गर्दी करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.