शिरूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने कवठे येमाई ता. शिरूर येथील गट न.२६७ मध्ये वनविभागाची परवानगी न घेता निलगिरी, सिसम, लिंब अशी दहा झाडे पाडून अनाधिकृत बांधकाम केले आहे.वृक्षप्रेमींनी याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला असून परवानगी न घेता मोठी झाडे तोडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबतची माहीती कवठे येमाई येथील ग्रामस्थ शरद उघडे यांनी दिली आहे.तसेच जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर ठिकाणी बांधकामही केले असल्याचा आरोप शरद उघडे, अमर उघडे यांनी केला आहे. जर शासकीय आधिकारी नियम डाववून बेकायदेशीरपणे वृक्ष तोडत असेल तर याला वेळी चाप बसणे गरजेचे आहे.
काही महीन्यांपुर्वी शिरूर पंचायत समिती आवारातील वृक्ष तत्कालीन गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी कापले होते. त्या विषयी वृक्ष प्रेमींनी आवाज उठवून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. आता वनविभाग व जिल्हाधिकारी साहेब सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? राजकीय हस्तक्षेपामुळे पाठीशी घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या विषयी वन परीक्षेत्र आधिकारी प्रताप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या गट नंबरमध्ये वृक्ष काढण्याची कुठलीही परवानगी काढलेली नाही.पंचनामा करण्यात येईल योग्य ती कारवाई करण्यात येईल.