पावसाळ्यात नागरिकांनी सापांपासून सावधान; वाचा विषारी सापांची माहिती

सापांच्या चारच जाती विषारी, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये

शिक्रापूर (शेरखान शेख) – सध्या पावसाळ्याचे दिवस तसेच सापांचा प्रजनन काळ असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी साप आढळून येत असतात. मात्र सर्वच साप विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना माहिती दिल्यास साप देखील वाचू शकतो तसेच नागरिकांचा धोका देखील टळू शकतो.

साप हे खरे तर शेतकऱ्यांचे मित्र असतात, मात्र साप निदर्शनास येताच नागरिकांची बोबडी वळते परंतु शेतात पिकांचे नुकसान करणारे उंदीर साप फस्त करत असल्यामुळे शेतातील पिकांचे एक प्रकारे रक्षण होत असते त्यामुळे काही शेतकरी शेतात साप आढळून आल्यास त्याला मारत देखील नाहीत तर समाधान व्यक्त करतात, ग्रामीण भागामध्ये सध्या सापांचे प्रमाण वाढलेले असून सर्प साप विषारी नसून फक्त फुरसे, घोणस, नाग, मण्यार हे साप विषारी आहेत अनेक ठिकाणी सर्पदंश होऊन अनेकांना मृत्यूने कवटाळले आहे, एक वर्षापूर्वी शिरुर तालुक्यातील सविंदणे येथे घोणस साप मारल्यामुळे चार जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तर वाघाळे येथे सर्पदंश झाल्यानंतर मंत्राचा वापर करत असल्याने एका मांत्रिकावर गुन्हे दाखल होत मांत्रिकाला जेलची हवा घ्यावी लागली आहे.

आपल्या भागात आढळणारे घोणस व अजगर तसेच मण्यार व कवड्या हे साप एकसारखेच दिसत असल्याने अनेकदा नागरिक विषारी मण्यार सापाला कवड्या समजून तर विषारी घोणस सापाला अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात परंतु पुरेशी माहिती नसल्याने सर्पदंशाचा धोका नागरिक ओढून घेतात, मागील आठवड्यात शिक्रापूर येथील एका ठिकाणी लहान मुलाच्या बुटामध्ये नागाचे पिल्लू बसले असल्याचे आढळून आले आहे.

तर पावसाळयामध्ये अनेक ठिकाणी शेतातील कामे करताना तसेच घराजवळील अडगळीच्या ठिकाणी साप बसलेले असतात परंतु नागरिक पुरेशी खबरदारी न घेता सदर ठिकाणी कामे करतात त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता उद्भवते, सध्या सर्वत्र सर्पमित्र उपलब्ध असल्याने नागरिकांनी सापांबाबत गैरसमज न ठेवता आपल्या निसर्गाच्या रक्षणासाठी पुणे येथे काळाची गरज बनलेली आहे.

“सर्व साप हे विषारी नसतात त्यामुळे एखाद्या नागरिकाला चावलेला प्रत्येक साप विषारी असेलच असे नाही, एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्याला धीर देत जवळील रुग्णालयात घेऊन जावे, सर्पदंशावर प्रभावी औषधे उपलब्ध असल्याने वेळीच उपचार मिळाल्यास नागरिकांचा जीव वाचू शकतो,” असे वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे यांनी सांगितले.

विषारी सापांची थोडक्यात माहिती

फुरसे – फुरसे साप घनदाट जंगलात आढळत असून त्याची लांबी दोन ते अडीच फुट वाढते तर हा साप लहान व पातळ तसेच विषारी आहे.

घोणस – घोणस साप अत्यंत विषारी असून हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो, ग्रामीण भागातील नागरिक त्याला परड म्हणून ओळखतात तर काही नागरिक त्याला अजगर म्हणतात हा साप कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो.

नाग – नाग फणा काढत असल्याने नाग सहजपणे ओळखून येतो, हा विषारी असून चावण्यापूर्वी फणा काढून फुस्कारतो हा देखील विषारी साप आहे.

मण्यार – मण्यार साप भारतातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जात असून हा साप सहसा रात्रीच्या वेळी आढळून येतो, या सापाचे दात लहान असल्याने साप चावलेले देखील समजून येत नाही.

सर्पमित्र ॲप मोबाईलमध्ये प्रभावशाली

देशभरातील सर्व भागातील सर्पमित्रांची माहिती व सापांबाबत माहिती नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी बारामती येथील अमोल जाधव या सर्पमित्राने सर्पमित्र ॲप तयार केले असून त्यामुळे नागरिकांना देशभरातील सर्व सापांची माहिती तसेच आपल्या भागातील सर्पमित्रांची माहिती व मोबाईल नंबर उपलब्ध होत आहेत त्यामुळे सर्पमित्र ॲप मोबाईलमध्ये प्रभावशाली असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.