स्टॅम्पच्या तुटवड्यामुळे नागरिक झाले हैराण

कामे खोळंबली; शासनाच्या महसुलास लागतोय ब्रेक?

सातारा  – सातारा शहरात मंगळवारी व बुधवारी दोन्ही दिवशी स्टॅम्पचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे स्टॅम्प मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्टॅम्प विक्रीच्या माध्यमातून शासनास लाखो रुपयांचा महसूल मिळत असताना या महसुलाला ब्रेक का लागतोय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सातारा येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात, गोडोली नाक्‍यावरील दस्त नोंदणी कार्यालयात स्टॅम्प व्हेंडरच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्टॅम्प, रेव्ह्यूनी स्टॅम्पची विक्री होत असते. याशिवाय शासन मान्य स्टॅम्प व्हेंडरकडून सातारा शहरात अनेक ठिकाणी स्टॅम्प मिळत असतात. मात्र अनेक वेळा स्टॅम्प संपले आहेत, सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम आहे आदी कारणे सांगितली जातात. वारंवार स्टॅम्पचा तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

सातारा शहरात मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत विविध प्रकारचे स्टॅम्प उपलब्ध नव्हते. मंगळवारी स्टॅम्पबाबत विचारणा केली असता बुधवारी सकाळी मिळतील, असे स्टॅम्प व्हेंडर सांगत होते. मात्र बुधवारी दुपारनंतर स्टॅम्प उपलब्ध झाले. दीड दिवस स्टॅम्प उपलब्ध न झाल्याने खेडोपाड्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

या आठवड्यात सलग तीन दिवस बॅंकांना सुट्टी असल्याने बॅंकांशी निगडीत कामांसाठी स्टॅम्प घेणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र दोन दिवस स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. तांत्रिक अडचणी आहे, सर्व्हर डाऊन आहे, अशी स्टॅम्प तुटवड्याची कारणे सांगितली जात आहेत.

तक्रारींकडे होतेय दुर्लक्ष

स्टॅम्प तुटवडा हा सातारकरांसाठी काही नवी नाही. अनेकदा असे प्रसंग निर्माण होतात. वास्तविक स्टॅम्प विक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळत असताना स्टॅम्प पुरवठा ज्या पध्दतीने व्हायला पाहिजे तसा होताना दिसत नाही. तुटवड्याबाबत अनेकदा तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्टॅम्प व्हेंडरकडे स्टॅम्पच येत नसेल तर त्यांना दोष देवूनही उपयोग नाही. याबाबत संबंधितांनी सुधारणा करण्याची मागणी सातारकरांमधून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.