उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांकडे?, बनसोडे, शेळकेंबाबत चर्चा
पिंपरी (प्रतिनिधी) –राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तालाला अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार दि. 30 रोजी होणाऱ्या विस्ताराकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदावर अजित पवारांची वर्णी लागण्याबाबत शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे. तर मावळमधून दणदणीत विजय मिळविणारे सुनील शेळके आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यापैकी कोणाची लॉटरी लागणार, यावर चर्चा रंगल्या आहेत.
राज्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर भाजपाला सत्तेबाहेर खेचून शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. महिनाभरापूर्वी सत्तेत आलेल्या या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. सोमवारी या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असल्यामुळे शहरवासियांचे या विस्ताराकडे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातून अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश निश्चित मानला जात असला तरी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रिपद मिळणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरावर तब्बल 15 वर्षे एकहाती सत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रवादीला राज्यापाठोपाठ महापालिकेतील सत्तेवरूनही पायउतार व्हावे लागले होते. पाच वर्षांनंतर पुन्हा राज्यात सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यामुळे संजीवनी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवडची धुरा अजित पवार यांच्याच हाती असल्यामुळे पवारांचा समावेश शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसाठी बळ देणारा ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला गृहमंत्रीपद आले नसले, तरी हे मंत्रिपद राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर हे पद अजित पवार यांनाच मिळेल, अशी चर्चा जोरात आहे. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अजित पवार यांच्याकडेच येणार असल्यामुळे स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मावळमधून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलेल्या सुनील शेळके यांच्या नावाचीही चर्चा प्रचंड मताधिक्यामुळे अजित पवारांसोबतच रंगली आहे. मावळ लोकसभा, पिंपरी-चिंचवड महापालिकेची 2022 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक आणि शेळके यांची पिंपरी-चिंचवड शहरासोबतच मावळ लोकसभेसाठी असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन शेळके यांची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेची पहिली टर्म एवढी बाब दुर्लक्षित केल्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या “गुडबुक’मध्ये जागा मिळविलेल्या शेळके यांना संधी दिली जाईल, असे बोलले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे एकमेव विजयी ठरले. अजित पवार यांनी केलेल्या बंडाला त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली होती. अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये सर्वांत जवळचे म्हणून सध्या बनसोडे गणले जात आहेत. यामुळे बनसोडे यांच्या समावेशाबाबतही बोलले जात आहे. मात्र, अजित पवारांशी निष्ठा दाखविताना त्यांनी शरद पवार यांच्यासोबत घेतलेला “पंगा’ हा त्यांच्यासाठी मोठा अडथळा ठरू शकतो. याशिवाय बनसोडे यांना संधी दिल्यास पक्षामध्येही वेगळा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बनसोडे यांच्याबाबत नेमका काय निर्णय होणार यावर राजकीय पटलावरही चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर शहर पोरके
पिंपरी-चिंचवड शहरावर एकेकाळी प्रा. रामकृष्ण मोरे यांचे वर्चस्व होते. त्यांच्या रुपाने शहराला मंत्रिपदही मिळाले होते. त्यानंतर मात्र शहराची धुरा सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी शहरातील कोणत्याही आमदाराला मंत्रिमंडळात संधी दिली नाही. शहराबरोबरच पालिकेतील सत्तेची गणिते बदलण्यासाठी तसेच भाजपाला शह देण्यासाठी शेळके अथवा बनसोडे यांच्यापैकी एकाला संधी मिळावी, अशी अपेक्षा शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. दोघांपैकी एकाला संधी मिळाल्यास मोरे यांच्यानंतर मंत्रिमंडळातील समावेशपासून “पोरके’ राहिलेल्या शहराला दिलासा मिळणार आहे.