पुणे जिल्हा: आधार केंद्रच नसल्याने नागरिक निराधार

पानशेत परिसरात गैरसोय : लोकप्रतिनिधी सुस्तावले

वेल्हे -वेल्हे तालुक्‍यातील पानशेत येथे आधार केंद्र नसल्यामुळे नागरिक निराधार झाले आहेत. आधार कार्डसाठी नागरिकांना हवेली तालुक्‍यात यावे लागत आहे. दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या वेल्हे तालुक्‍यात ही विदारक अवस्था नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. आधार केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी सुस्तावले आहेत काय, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उमटत आहे.

पानशेत हे महत्वाचे बाजारपेठ असलेले गाव आहे. पानशेतच्या आसपास 39 गावे आहेत. परिसराचा विस्तार मोठ्या प्रमणात आहे. अनेक वर्षापांसून येथील प्रश्‍न प्रलंबीत आहेत. शासनाने आधार कार्डचा सरसरकट वापर केल्याने प्रत्येक कामाला आधार कार्डची गरज पडत आहे. सरकारी कामापासून ते खासगी कामापर्यंत आधार अनिवार्य झाले असल्याने लोकांची मोठी पंचाईत झाली आहे.

पानशेत परिसर कित्येक वर्षापासून विकासापासून दूर राहिला आहे. दुर्लक्षित भागात एकही आधार केंद्र नसल्याने या भागातील नागरिकांना डोणजे किंवा नांदेड (ता. हवेली) येथे 50 ते 60 किलोमीटर जावे लागते, अशी विचित्र परिस्थिती असताना सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते जनतेला आधार देण्यासाठी अद्याप पुढे आलेले नाही.

हे विदारक वास्तव आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या पानशेत परिसरातील नागरिकांना डोणजे व धायरी येथे जावे लागत असल्याने एक दिवस अगोदर नंबर लावावा लागत आहे. त्यामुळे पानशेत येथे लवकर आधार केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

रोजीरोटी बुडवून दोन दिवस वाया
बॅंकेपासून तर रेशनकार्डपर्यंत ओळख म्हणून आधार कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, पानशेत येथे एकही आधार केंद्र नाही. त्यामुळे नवीन आधार कार्ड तयार करायचे असेल किंवा जुने आधार कार्ड दुरूस्त करायचे असेल तर नागरिकांना हवेली तालुक्‍यात जावे लागत आहे. यामध्ये दोन दिवस पूर्ण वाया जात आहे. बायोमेट्रिक पद्धतीने ई पास मशीनद्वारे रेशन दुकानात अन्न धान्याचे वितरण करताना अंगठे जुळत नाही. म्हणून आधार कार्डात दुरूस्ती करण्याकरिता निराधार, वयोवृद्ध लोकांना मोठा फटका बसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.