संथगतीच्या विकासकामांमुळे नागरिक हैराण

प्रशासनाची दिरंगाई : टप्प्याटप्प्याने करावीत रस्त्यांची कामे, नागरिकांची अपेक्षा

सांगवी – जुनी सांगवी, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण झाले आहेत. एकेक काम पूर्ण करूनच अन्य ठिकाणी खोदाई करावी, जेणेकरून वाहनचालक, पादचाऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शहरात रस्ता दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परंतु संबंधित रस्त्याचे काम सुरू असताना रहदारीसाठी कोणत्या मार्गाची व्यवस्था केली आहे, तसे मार्ग दर्शविणारे फलक लावण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली दिसत नाही. त्यामुळे नागरिक, वाहनचालक, पादचारी, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाच्या अशा बेजबाबदारपणाच्या वर्तनाला जनता पूर्णपणे वैतागली आहे.

जुन्या सांगवीत प्रवेश करताना एमएस काटे चौक ते माकन हॉस्पिटल चौकादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. हे बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ तसेच आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

सोयीसुविधा, सुधारणा ह्या नागरिकांच्या हितासाठी असाव्यात, त्यातून त्यांना त्रास होत असेल तर अशा व्यवस्था काय कामाची, असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे.गेल्या अनेक महिन्यापासून होत असलेल्या विकासकामांसाठी मिळेल त्या ठिकाणी व कोणत्याही प्रकारची काळजी व पर्यायी व्यवस्था न करता करण्यात आलेल्या खोदकामांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

याबरोबरच नवी सांगवीतून पाण्याच्या टाकीकडून जुनी सांगवीकडे येणाऱ्या जाणाऱ्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. हे काम देखील अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्र नजीक रस्ता बंद केल्याने वाहनचालकांना गणपती चौकातून वळसा घालून ढोरेनगर, जयमालानगर, पवारनगरकडे जावे लागत आहे. दापोडीकडे जाताना किंवा येताना याच मार्गाचा वाहनचालकांना अवलंब करावा लागत आहे.

पिंपळे गुरव येथील डायनासोर पार्कच्या जवळील रस्ता एक वर्षापासून बंद आहे. तर पार्कच्या समोरील रस्ता अर्धा बंद केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना मोठा वळसा घालून घरी यावे लागत आहे. बऱ्याच दिवसांपासून हे काम सुरू असल्याने नागरिक पूर्णपणे हैराण झाले आहेत. प्रशासनाविषयी नाराजी व्यक्‍त केली जात आहे. नवी सांगवी ते स्वामी विवेकानंद नगर हा रस्ता मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काही सोसायटींमध्ये वाहनांची ये-जा करणेदेखील कठीण झाले आहे. असे नियोजन शून्य कामकाज चालू आहे. त्यामुळे विकासकामे होत असतील परिसरातील नागरिक आनंदी असतात. आपल्या समस्या दूर होतील हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती असतो, पण अशा संथ गतीने कामे सुरू असल्यामुळे नागरिकांच्या मनात ही विकासकामे झाली नाही तरी चालतील अशीच भावना निर्माण झाली आहे.

रस्त्यांची खोदाई करताना नियोजन केले नाही. त्यामुळे येथे काही घटना घडली तर ना ऍम्ब्युलन्स येऊ शकते ना अग्निशामक दलाची गाडी. त्यामुळे विकासापाई नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. तेव्हा नियोजन करून शिस्तबद्ध विकास करावा, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत. दापोडीकडून पिंपळे गुरवकडे येणाऱ्या मार्गावर हॉटेल महाराजा ते रामकृष्ण मंगल कार्यालय चौकादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच भवानी मंदिर ते लक्ष्मीनगर, साठफुटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था व मार्ग मोकळे न ठेवता एकाच वेळी सर्व ठिकाणी करण्यात येत असलेल्या खोदकामाला नागरिक कंटाळले आहेत. अशा नियोजनशून्य विकासकामांमुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विकासकामे हाती घेताना नागरिकांना, पादचाऱ्यांना, वाहनचालकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

व्यावसायिकांवर आर्थिक कुऱ्हाड
या रस्त्याच्या असणारी व्यावसायिक दुकाने बंद पडण्याचे मार्गावर आहेत. त्यांना या विकासमाकाचा मोठा फटका बसत आहे. रस्त्याने ये-जा करणे कठीण होत असल्याने ग्राहकांनी तिकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुकानदार पूर्णपणे वैतागले आहेत. ही विकासकामे अशीच संथ गतीने सुरू राहिली तर त्यांना व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तेव्हा विकासकामे करा, पण ती नियोजनपूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.

बंद असलेले रस्ते
एमएस काटे चौक ते माकन हॉस्पिटल चौक
नवी सांगवीतून पाण्याच्या टाकीकडून जुनी सांगवीकडे येणारा रस्ता
बॅंक ऑफ महाराष्ट्र नजीक रस्ता
पिंपळे गुरव येथील डायनासोर पार्कच्या जवळील व समोरील रस्ता
नवी सांगवी-स्वामी विवेकानंद नगर रस्ता

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.