तरुणांच्या स्टंटबाजीमुळे नागरिक हैराण

विनामास्क चालवतात गाडी

पिंपळे निलख – करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने नागरिकांसाठी तसेच वाहनचालकांसाठी काही नियमावली तयार केली आहे. परंतु या नियमावलीला शहरातील युवा मात्र केराची टोपली दाखवत आहेत. एकाच दुचाकीवर तीन ते चार जण बसून गाडी वेगाने चालवताना दिसून येत आहेत. तर काही तरुण आपल्या तोंडाला मास्क देखील लावत नाहीत. सायलन्सरचा आवाज काढत स्टंटबाजी करत गाडी चालवत असल्याने स्थानिक नागरिक व इतर वाहनचालक हैराण झाले आहेत.

बरेच तरुण स्पोर्ट बाइक घेऊन रेस ओढत मोठा आवाज काढत वेगाने गाडी चालवतात तसेच मोठ मोठ्याने हॉर्न वाजवत आहेत. त्यामुळे इतर वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. काही वाहनचालक अचनाक आलेल्या आवाजाने घाबरून वाहनांना अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना आशा पद्धतीने स्टंटबाजी करणारांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

अनलॉक झाल्यापासून करोना शहरातून गायब झाला की काय अशा अविर्भावात नागरिक, तरुण वावरत आहेत. बहुतांश तरुण तर काहीच काम नसताना इतरत्र भटकंती करताना दिसून येत आहेत. फिरताना एकटेच न फिरता गाडीवर आणखी दोन तीन मित्र बरोबर घेऊन तोंडाला मास्क न लावता शहरात फेरफटका मारत आहेत. परंतु पोलीस प्रशासनाचे यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा वावर वाढला आहे.

सांगवी परिसरात साई चौक, शितोळे चौक, जुनी सांगवी, कृष्णा चौक आदी ठिकाणी रोडरोमिओ तीन तर काही वेळेस चारच्या संख्येने एका मोटारसायकलवरून प्रवास करताना दिसून येत आहेत. तर काही तरुण गाडी चालवताना फोनवर बोलत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी आपल्या पाल्ल्यांना वाहन देताना काळजी घेणे गरजेचे असताना व आपल्या मुलांवर लक्ष देणे गरजेचे असताना याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने यास मुले जबाबदार आहेत की पालक हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नियम धाब्यावर बसवून वाहने चालवतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

अल्पवयीन तरुणांच्या हाती गाड्या
वाहनपरवानाशिवाय गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु सध्या करोनामुळे शाळांना सुटी आहे. ऑनलाइन अभ्यास घेतला जातो पण त्याकडे लक्ष न देता घरी असलेली गाडी पालकांसमोर अथवा त्यांच्या लक्षात येणार नाही अशा वेळी घेऊन शहरात फिरताना दिसून येत आहेत. अशा अल्पवयीन युवकांवर पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याने त्यांचा दुचाकीवरील वावर वाढला आहे. वाहन चालवणारे अनेक अल्पवयीन असून याना पालक आपली वाहने कशी देतात हाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.