मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्यास ‘शूट अॅट साईट’ची ऑर्डर दिल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.
सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यांतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून याची (CISF) गंभीर दखल घेण्यात आली. झेड दर्जाची सुरक्षा असताना सोमय्यांवर यापूढे हल्ला झाल्यास ‘शूट अॅट साईट’चे आदेश देऊ, असा पवित्रा CISF ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, “CISF ने असा काही आदेश दिला असेल, मला असे वाटत नाही. कारण असा आदेश देण्याची परवानगी कोणालाच नसते. त्यांचे काम संरक्षण करण्याचे आहे. महाराष्ट्र पोलीस किंवा CISF अशा पद्धतीचा निर्णय घेत नाहीत. तरीही याची मी खातरजमा करेन, असं वळसे-पाटील म्हणाले.