मुंबई : मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्यगिक सुरक्षा दलाच्या आणखी सहा जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यामुळे या दलातील बाधितांची संख्या 11 वर पोहोचली असून या तुकडीतील अन्य 142 जवानांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जवानांमध्ये चार जणांची चाचचणी गुरूवारी पॉझिटिव्ह आली होती. तर शुक्रवारी आखणी सहा जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका जवानामध्ये काही दिवसांपुर्वी याची लक्षणे आढळली होती. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आणखी चार जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. तर शुक्रवारी आणखी सहा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्यासोबत नवी मुंबईतील तळावर राहणाऱ्या 142 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्या सर्व जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले असून हा तळ सील करून त्याचे निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलातील एका डॉक्टरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला हरीयाणातील झज्जर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा डॉक्टर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या कार्यालयात कार्यरत होते.