सिनेजगत : वादाचे “तांडव’

सोनम परब

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा स्थापन करणे गरजेचे आहे. जर वेळीच पायबंद घातला नाही तर एक नाही दहा दहा तांडव प्रसारित होतील. समाजात दुही माजवणाऱ्या अप्रवृत्ती अगोदरपासूनच सक्रिय आहेत. अशा स्थितीत आपण जबाबदारीने राहिलो नाही तर “तांडव’ होणे स्वाभाविक आहे.

चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकेवरून होणारे वाद नवीन नाहीत. अशा प्रकारचे वादंग माजले की निर्माता आणि दिग्दर्शक माफी मागून सारवासारव करतात किंवा चित्रपट आणि मालिकेच्या सुरुवातीला स्पष्टीकरण देणारी सूचना देतात. शेवटी वादग्रस्त प्रकरण शांत होते. काही वेळा अशा प्रकारचे वाद उकरून काढले जातात तर काही वेळा प्रसिद्धी मिळवण्यासाठी देखील स्टंटबाजी केली जाते. सध्या “तांडव’ या वेबसीरिजवरून निर्माण झालेल्या वादामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. या वेबमालिकेत देवतांचा अपमान केल्याप्रकरणी मालिकेच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

एकीकडे ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणाऱ्या तांडववरून गदारोळ निर्माण झालेला असताना मिर्झापूर ही वेबमालिकाही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. “मिर्झापूर-2′ वरून गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील रहिवाशी अरविंद चतुर्वेदी यांनी निर्मात्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली असून मिर्झापूर गावची प्रतिमा हनन करण्याचा आरोप केला आहे.

करोना काळात मनोरंजन माध्यमांनी ओटीटी प्लॅटफॉर्मची कास धरली. त्यामुळे वेब मालिका आणि चित्रपटांचा धडाका सुरू असून त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नसल्याने वेब मालिकांचे निर्माते बेलगाम झाले आहेत. या वेबसीरिजमधील अश्‍लिलता, आक्षेपार्ह संवाद यांविषयी सातत्याने काही ना काही मुद्दे चर्चेत येत आहेत. “तांडव’ मालिकेच्या पहिल्या पंधरा मिनिटांतच अभिनेता जीशान अयूबचा प्रवेश होतो. अनेक पात्र असलेला कार्यक्रम तेथे सुरू होतो. जीशानने हातात डमरू, त्रिशूळ घेऊन भगवान शिवचे रूप धारण केलेले असते.

नाटकादरम्यान “आजादी-आजादी’ अशा घोषणा दिल्या जातात आणि त्याचवेळी अयूबच्या तोंडातून आक्षेपार्ह संवाद बाहेर पडतात. मालिकेतील हे दृश्‍य जेएनयूतील घटनेशी जोडलेले दिसून येते. या दृश्‍यावरून आणि जीशान अयूबने भगवान शंकरांच्या रूपातून केलेल्या संवादांवरून गदारोळ उडाला आहे. देशभरातून या मालिकेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तसेच यानिमित्ताने चित्रपट आणि मालिकेतून नेहमीच धर्मांच्या भावनांशी का खेळ केला जातो, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
या गोंधळादरम्यान दिग्दर्शक अली अब्बास जफरने एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यात माफी मागितली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.

श्रोत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याचा विचार करायलाच हवा. जात, समुदाय किंवा धार्मिक भावनांना ठेच लागावी किंवा त्यांचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी नमूद केले आहे. ही एक काल्पनिक कथा असून ती वास्तवाशी जोडली जात असेल तर तो योगायोग मानावा, अशा पठडीतील शब्दांचा वापर करत निर्माते आणि दिग्दर्शकांनी संतप्त श्रोत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे कायदा आपले काम करत राहील.

या वादाची दुसरी बाजू पाहिली पाहिजे. जर आताचा गोंधळ झाला नसता तर “तांडव’ची इतकी चर्चा झाली नसती. आता सर्वांनाच “तांडव’ पाहण्याची इच्छा झाली आहे. वादग्रस्त दृश्‍य वगळण्याची मागणी केली जात असून देशात शांतता आणि बंधुभाव कायम राहावा, असे आवाहन केले जात आहे. “तांडव’वरून देशात वाद निर्माण झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत अचानक वाढ झाली, हे विशेष. निर्माता आणि दिग्दर्शकांनी कितीही आदळआपट केली तरी काल्पनिक कथानकातून वास्तवातील परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. “तांडव’मध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलन दाखवले आहे. जेएनयूच्या जागी व्हीएनयू म्हटले आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी गटातील मारामारी देखील पाहवयास मिळत आहे. या मालिकेत राजकारणातील तांडव देखील दाखवण्यात आले आहे. या माध्यमातून काहीवेळा तुकडे तुकडे गॅंगला देखील ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा भास होत आहे. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा आधार घेत अशा प्रकारे लोकभावनांशी खेळता येणार नाही, असे तांडव विरोधकांचे म्हणणे आहे.

सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी समाजातील मोठा वर्ग जोडला गेला आहे. अशा प्रकारच्या प्रचार तंत्रात समाजाच्या भावना बिनदिक्‍कतपणे पायदळी तुडवल्या जात आहेत. या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अनेक घटनांमुळे, दृश्‍यांमुळे समाजात विचित्र परिस्थिती निर्माण होत आहे. वास्तविक, अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य हे अमर्याद नाही. त्याला जबाबदारपूर्वक वर्तनाची एक चौकट आहे. ती नसती तर या स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर झाले असते. त्यामुळेच चित्रपट असो किंवा वेब मालिका असो कोणाच्याही भावनांना अकारण ठेच पोहोचणार नाही, याची खबरदारी त्यांनी घ्यायला हवी. समाजात द्वेष, मत्सर पसरवणाऱ्या गोष्टींना थारा मिळणार नाही, याची काळजी या माध्यमांनी घ्यायला हवी. पण अलीकडील काळात मनोरंजन-माहिती यापेक्षा द्वेष, विखार, चिथावणीखोर, भावना भडकावणारा कंटेंटच या माध्यमातून अधिक प्रसारित होताना दिसत आहे, अशी तक्रार ऐकायला मिळते.

कदाचित म्हणूनच, माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाही याची दखल घ्यावी लागली. अलीकडेच, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वत:ची नियमावली असणे गरजेचे सांगितले आहे. त्यादृष्टीने कार्यवाही झाली नाही तर सरकार त्यावर विचार करेल, अशी तंबीही देण्यात आली आहे. लेखन स्वातंत्र्याच्या नावावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याबाबत निर्मात्यांना दक्षता बाळगावी लागणार आहे. करोनामुळे बहुतांश चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. जर हे चित्रपट पडद्यावर येत असतील तर मागदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.