सोनम परब
कालौघात बॉलीवूड पार्ट्यांना ग्लॅमर मिळाले. पण ते फसवे असते, हे जाणून अशा पार्ट्यांपासून
स्वतःला नेहमी दूर ठेवणारे कलाकारही या चंदेरीनगरीत आहेत. अशा नॉनअल्कोहोलिक आणि पार्टीपराङ्मुख कलाकारांविषयी…
बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या पार्ट्या यांची खमंग चर्चा चंदेरीनगरीसह माध्यमे व समाजात नेहमीच होत असते. हल्ली सोशल मीडियामुळे अशा पार्ट्यांचे “अंतरंग’ही पाहायला मिळते. तसेच पार्ट्या आटोपून अडखळत बाहेर येणारे नायक-नायिकाही अनेकांनी पाहिले आहेत. किंबहुना आपल्याकडील मध्यमवर्गीय समाजात पूर्वीपासून या क्षेत्रामध्ये जाण्यास विरोध होण्यामागे या पार्टीकल्चरचे म्हणजेच “बिघडण्याचे’ कारण सांगितले जात असे.
काही वर्षांपासून बॉलीवूडनगरी आणि अंमलीपदार्थ यांच्या कनेक्शनवरून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून सातत्याने बातम्या येत आहेत. विशेषत: ड्रग पार्टीत सेलिब्रिटींचा सहभाग वाढत चालल्याने बॉलीवूडची बदनामी होत आहे. पूर्वी एखादा चित्रपट सिल्व्हर ज्युबिली किंवा गोल्डन ज्युबिली झाला तर निर्मात्याकडून पार्टी दिली जायची. कालानुरूप पार्टीचे स्वरूप बदलत गेले आणि आता त्यात अंमलीपदार्थाचा शिरकाव झाला.
सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा प्रकाशझोतात आहे. नार्कोटिक्स खात्याच्या पथकाने क्रुझ पार्टीवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अंमलीपदार्थाचे पाकीट सापडले आहे. या घटनेने बॉलीवूडचे ड्रग्जशी असणारे संबंध समोर आले; परंतु बॉलीवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत की ते पार्टीपासून नेहमीच अलिप्त राहतात. भट्ट कंपनी किंवा कपूर खानदानातील मंडळी नियमितपणे पार्टीत असतात तर दुसरीकडे आमीर खान,
अक्षयकुमार, सनी देवल यासारखे अभिनेते पार्टीत सहभागी होण्याऐवजी झोप काढण्याला महत्त्व देतात. पार्टीत न येण्याचे प्रत्येकाची कारणे वेगवेगळी आहेत. ते पार्टीच नाही तर सिगारेट, मद्याला हातही लावत नाही. एवढेच नाही तर काही मंडळी पुरस्कार वितरण सोहळ्यात देखील जात नाहीत.
अमिताभ बच्चन : महानायक अमिताभ बच्चन हे आपल्या आरोग्याबाबत खूपच सजग आहेत. अमिताभ धूम्रपान करत नाहीत आणि अल्कोहोलही घेत नाहीत. पार्टीत मात्र काही वेळा बिग बी दिसतात. कारण पार्टीचे केंद्रस्थानच बिग बी असतात. त्यामुळे इच्छा नसतानाही चाहत्यांच्या प्रेमापोटी पार्टीत काही वेळा महानायक दिसतात.
अक्षयकुमार : खिलाडीकुमार अक्षयकुमारला पार्टीचा तिटकारा आहे, हे सर्वश्रूत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्याचा दिनक्रम. तो रात्री नऊ वाजता झोपतो आणि पहाटे चार वाजता उठतो. म्हणूनच तो पार्ट्यांना नम्रपणे नकार देतो. अक्षय हा साखर, मीठ तसेच स्मोकिंग, अल्कोहोलबाबत जागरूक आहे. तो कधीही मद्यपान करत नाही.
चाहत्यांना देखील हेल्दी डायट आणि जीवनशैलीबाबत सतत प्रोत्साहित करत असतो. वयाची पन्नाशी ओलांडली तरी अक्षयकुमारच्या तारुण्याचे रहस्य हे त्याच्या फिटनेसमध्ये दडलेले आहे. त्याला झोपेतून उशिरा उठणे आवडत नाही. एखाद्या पार्टीला गेलाच तर तो तेथून लवकर निघतो. जेणेकरून झोपेचे वेळापत्रक बिघडणार नाही.
आमीर खान : आमीर खान तर सुरुवातीपासून फारसा कोणात मिसळत नाही. तो पुरस्कार वितरण सोहळ्यातही जात नाही आणि पार्टीतही दिसत नाही. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आमीर खानला लाउड म्युझिकचा त्रास होतो. या संदर्भातील खुलासा त्याची घटस्फोटित पत्नी किरण रावने काही वर्षांपूर्वी केला होता.
जॉन अब्राहम : जॉन अब्राहमला देखील पार्टी करण्यात फारसा रस नाही. तो बॉलीवूडच्या कोणत्याच कार्यक्रमांना हजेरी लावत नाही. एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जॉनच्या व्हेजिटिरियन डायटची नेहमीच चर्चा होते.
सनी देओल : चित्रपटात आक्रमक भूमिका साकारणारा सनी देओल हा खूपच लाजाळू आहे. त्यालाही पार्ट्या आवडत नाही. पार्टी म्हणजे नशापान, गॉसिपिंग असल्याचे तो म्हणतो. म्हणूनच तो चार दशकांच्या करिअरमध्ये कोणत्याही पार्टीत फारसा दिसला नाही.
मनोज वाजपेयी : बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता मनोज वाजपेयी हा पार्टीत फारसा रमत नाही. तो म्हणतो, पार्टीत जात नाही कारण तेथे केवळ देखावा असतो. स्वत: दाखवण्याची चढाओढ सुरू होते. प्रत्यक्षातील आणि पार्टीतले रूप वेगळे असते. त्यामुळे मी सहभागी होत नाही.
याउलट मला लहानसहान गेट टू गेदर आवडतात. यात आपण एकमेकांशी बोलू शकता आणि आयुष्यावरच्या चार गोष्टी शेअर करू शकता. पार्टीतून काहीही मिळत नाही. केवळ आपण एक गर्दीचा भाग होतो आणि ते मला आवडत नाही.
शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टी पार्टीत तुरळक दिसते. आहाराबाबत खूपच सजग असणाऱ्या शिल्पा शेट्टीचा योगाभ्यास सर्वांनाच प्रेरित करणारा आहे. सूर्यास्तानंतर ती अन्नग्रहण करत नाही. त्यामुळे पार्टीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अल्कोहोलदेखील घेत नाही.
सोनाक्षी सिन्हा : बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा वजन कमी करण्यासाठी मेहनत करतेच त्याचबरोबर आहार, जीवनशैली, वर्कआउटकडे लक्ष देते. ती अल्कोहोलचे सेवन करत नाही आणि त्यापासून चार हात दूर राहते.
अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चन याने प्रतिमेला धक्का बसेल, असे कोणतेही वर्तन केलेले नाही. तो सिगारेट ओढत नाही आणि मद्यपानही नाही. एका मद्य कंपनीची जाहिरातही त्याने नाकारली होती.
इम्रान खान : आमीर खानचा भाचा इम्रान खान हा चित्रपटात फारशी छाप पाडू शकला नाही. परंतु त्याने बॉलीवूडच्या पार्ट्यांवर केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो म्हणतो, की सर्व पार्ट्यांचा एकच उद्देश असतो.
या पार्टीत येणारे लोक दारू पितात, नाचतात आणि एका कोपऱ्यात उभे राहतात. त्यानंतर त्यांना जे लोक आवडत नाहीत, त्यांच्याबद्दल गॉसिपिंग सुरू करतात.