चिमुकल्यांच्या मनावरही स्वच्छ सर्वेक्षणाची मोहोर

हस्तकला प्रदर्शनात बनवली पालिकेची प्रतिकृती
कराड –
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या स्पर्धेत देशात अव्वल क्रमांक मिळविला. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. शहरातील सर्व घटकांची मदत घेण्यात आली. इतकेच काय महाअभियान राबवून शाळा, महाविद्यालयांनाही सामावून घेण्यात आले. त्यामुळे पर्यायाने स्वच्छतेची मोहोर मुलांच्या मनावरही परिणामकारक ठरली. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक नऊ मधील इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीने शाळेतील हस्तकला प्रदर्शनात चक्क कराड नगरपालिकेची प्रतिकृती तयार करून त्यावर स्वच्छ सर्वेक्षणातील यशाचाही समावेश केला आहे. तिच्या या प्रतिकृतीचे कौतुक होऊन तिला प्रथम क्रमांक देण्यात आला.

पालिकेने सतत दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम राबविली. यात प्रत्येक स्तर सहभागी झाला होता. स्वच्छतेचे महत्व शालेय मुलांच्या मनावर बिंबवण्यातही पालिका पूर्णपणे यशस्वी ठरली. त्यामुळेच शाळेच्या हस्तकला उपक्रमामध्ये स्वच्छ मोहिमेची व देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पालिकेचा गौरव करणारी चित्रकृती तयार केली. दिपश्री अवधूत पाटील असे नगरपालिका शाळा क्रमांक नऊमधील विद्यार्थिनीचे नाव आहे.

या चिमुकलीने पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मिळवलेल्या यशाची पुठ्ठ्यांच्या सहाय्याने चित्रकृती तयार केली. पालिकेची भली मोठी इमारत, त्यामागे असणारी हिरवी झाडे, ओला व सुका कचरा डस्टबिन, पालिकेची अत्याधुनिक घंटागाडी, स्वच्छतेचा प्रतिक असणारा लोगो तयार केला आहे. पुठ्ठ्यांच्या सहाय्याने हुबेहूब नगरपालिकेच्या इमारतीची प्रतिकृती तयार केली आहे. तर हिरव्या रंगाची लोकर चिकटवून त्याच्या सहाय्याने हिरवी झाडे काढण्यात आली आहेत. ओला व सुका कचऱ्याचे डस्टबिन बनवतानाही पुठ्ठ्यांना विशिष्ठ रंग लावण्यात आला आहे. तर स्वच्छता अभियाना 2019 मध्ये देशात प्रथम क्रमांकफ असे लिहून पालिकेचा गौरव केला आहे.

मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी टाकाऊपासून टिकाऊ या संदर्भात शाळेत हस्तकला प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनामध्ये 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये दिपश्रीने स्वच्छतेचे महत्व अधोरेखीत करीत कराडला मिळालेल्या यशाचे कौतुक केले आहे. तिने तयार केलेल्या नगरपालिकेच्या प्रतिकृतीस प्रथम क्रमांक मिळाला आहे. या प्रदर्शनासाठी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी पाटील, ज्योती किर्तीकुडवे, अर्चना मुंढेकर, अंजली कदम, निलीमा पाटील, भारती पवार, रेश्‍मा माळवदे, शुक्राचार्य चोले, अजित केंद्रे, दिगंबर थिटे, श्रीपाद हेळंबेकर, अनिता भुंजे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.