नवी दिल्ली – अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी दिल्लीत मंगळावारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. या भेटीत प्रामुख्याने अफगाणिस्तानमधील स्थिती बाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आता पुर्ण होत आली असून त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा केली गेली. तथापि अधिकृतपणे या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. भारताने अफगाणिस्तानातील निर्वासित तेथून हलवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना साथ दिली होती व आपल्या नागरीकांबरोबरच भारताने अन्य देशातील नागरीकांनाही तेथून हलवले होते. अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारला चीन आणि पाकिस्तान या दोन देशांकडून पाठिंबा मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर या उपखंडात भारत हाच एकमेव देश असा आहे की जो अफगाणिस्तानातील संभाव्य हालचालींबाबत अमेरिकेला मदत करू शकेल. कारण भारताने अजून तालिबान बाबतचे आपले धोरण निश्चीत केलेले नाही तसेच त्यांच्या सरकारला पाठिंबा किंवा मान्यता देण्या बाबतही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान डोवाल यांनी आज दिल्लीत रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराबरोबरही अफगाणिस्तानच्या स्थिती बाबत चर्चा केली.