भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षापदासाठी चुरस

चंद्रकांत पाटलांसह पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांची नावे चर्चेत

मुंबई – राज्यात हाती आलेली सत्ता गेल्यानंतर आता भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र, मुख्यंत्रिपदावरून शिवसेनेशी मतभेद झाल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. यामुळे भाजपमध्ये सध्या प्रचंड खदखद सुरु आहे.

आता ती चव्हाट्यावर देखील आली आहे. त्यातच भाजपमधील गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असलेला गट अधिक आक्रमक झाला आहे. कोणत्याही पक्षाला प्रदेशाध्यक्षपद फार महत्त्वाचे असते. त्यातच आता सत्ता नसल्याने भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या पदासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांनीही दावा केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

पंकजा मुंडे यांना ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जाते. बीडसह राज्यात अनेक ठिकाणी मुंडे कुटुंबाच्या नावाचे वलय आहे. त्या उच्चशिक्षित माजी मंत्री असल्याने त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे. तसेच त्यांची भाषण शैली ही उत्तम आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागासह शहरातील मतदारांची एकाच वेळेस त्या जुळवून घेण्याची क्षमता आहे. मात्र मंत्रिपदावर असताना त्यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले आहेत. दुसरीकडे रावसाहेब दानवे हे भाजपचे विद्यमान खासदार असून मराठा समाजाचा चेहरा म्हणूनही त्यांना ओळखले जाते. दानवे यांची ग्रामीण भागातील जनमाणसांवर चांगली पकड आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षपदी काम केल्याचा अनुभवही त्यांना आहे. मात्र त्यांच्या वादग्रस्त विधान करण्यामुळे अनेकदा पक्ष अडचणीत आला आहे.

दानवेंप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनाही मराठा समाजाचा चेहरा म्हणून भाजपात ओळखले जाते. त्यांना पाच वर्षे मंत्री असण्याचा अनुभव आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. संघ आणि पक्षाच्या आदेशांचे नेहमी पालन करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या ते अगदी जवळचे आहे. आतापर्यंत कोणत्याही वादात त्यांचे नाव अडकले नाही. तसेच चंद्रकांत पाटील यांचा स्वभाव मृदभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा मनमिळाऊ आहे. चंद्रकांत पाटील ही पक्षाच्या चौकटीत राहून काम करतात.

दरम्यान, राज्यात मोठा पक्ष म्हणून कल मिळाल्यानंतर भाजप विरोधी पक्षात बसली आहे. यामुळे अनेक आमदारांचे हिरमोड झाला आहे. त्यातच अनेक नेत्यांकडून प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपद नेमक कोणाकडे जाणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)