ठाणे – मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणूकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असून आपले नगरसेवक फुटू नये यासाठी सर्व पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. भाजपने आपले नगरसेवक गोव्यातील ललीत हॉटेलमध्ये, तर शिवसेनेने काही नगरसेवक माथेरानला पाठविले आहेत.
महापौरपदासाठी भाजपमध्ये गटबाजी सुरु आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार गीता जैन यांनी आपल्या गटाचा महापौर बसवण्यासाठी फिल्डिंग लावले आहे. गीता जैन गटाकडून महापौर पदासाठी दावेदार असलेल्या नीला सोन्स या मेहता गटात सहभागी झाल्या आहेत. तर नरेंद्र मेहता यांची काय खेळी सुरु आहे, हेच भाजप नगरसेवकांना कळत नाही. नीला सोन्सला नरेंद्र मेहताचे समर्थन असल्याचे समोर येत आहे.
तर दुसरीकडे आमदार गीता जैन समर्थक नगरसेवक, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महापौर बनवण्यासाठी छुपी खेळी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमताचा आकडा असताना नरेंद्र मेहता यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालूसरे यांनी मिरा भाईंदर महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर बसविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परंतु, कॉंग्रेसचे 3 आणि शिवसेनेचा 1 नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. यात कॉंग्रेस नगरसेवक सारा अक्रम खान आणि अहमद शेख, तर शिवसेनेच्या दिप्ती भट्ट हे सध्या नॉट रिचेबल आहेत.