दोन ऍक्‍शन हिरोंचे चुपके चुपके…

विनोद कसा असावा आणि सात्विक विनोद कसा असावा याचे उत्तम उदहारण म्हणजे हृषिकेश मुखर्जी यांचा चुपके चुपके. हल्ली विनोदी चित्रपटांचा महापूर आला आहे. मात्र त्यातला विनोदाचा दर्जा काय, हे वेगळे सांगायला नको. अंगविक्षेप, आचरटपणा, तोकड्या वस्त्रांत वावरणाऱ्या ललना, द्विअर्थी संवाद आणि सगळेच कंबरेखालचे वार. याला बहुदा निर्माता, दिग्दर्शक विनोद म्हणतात. दुर्दैवाने या चित्रपटांना यशही मिळते आहे.

आंबटशौकीनांची दाद त्यांना मिळते. त्यामुळे निर्मात्यांचे फावते आहे. मात्र कुटुंबासह बसणेही अवघड व्हावे असे चित्रपट काढून आणि दाखवून ना आपण कलेचे भले करत आहोत, ना चित्रपटसृष्टीचे. पण हे निर्माता दिगदर्शक मंडळींना समजेल तो सुदिन!

1975 मध्ये हृषिदांचा चुपके चुपके आला. त्यावेळी अमिताभ बच्चन बॉलिवुडचे अँग्री यंग मॅन म्हणून जवळपास एस्टॅबलीश झाले होते. तर धर्मेंद्र अगोदरच माचो मॅन किंवा हि मॅन म्हणून फेमस होते. शोले याच सुमारासचा चित्रपट. तो बराच काळ चालला. त्याने हिंदी चित्रपट व्यवसायाची गणिते बदलून टाकली. अर्थकारणही बदलून टाकले. हिंसाचाराचा चेहरा किती क्रूर आणि भेसूर असू शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिले. धर्मेंद्र आणि अमिताभ यांचीच त्या चित्रपटात भूमिका होती.

बॉक्‍स ऑफिसची गणिते बदलत असताना आणि हिंसाचाराचे नवे मापदंड प्रस्थापित होत असताना शोलेमधीलच पॉप्युलर जोडी घेउन हृषिदांनी चुपके चुपके आणला आणि प्रेक्षकांचा एक सुखद अपेक्षाभंग केला.

विनोद किती सुंदर असू शकतो आणि आयुष्यात सुगंधित वारा स्पर्शून गेला तर काय बहार आणि वेगळीच अनुभूती येते ते या चुपके चुपकेने दाखवले. दोन तगडे ऍक्‍शनपटू एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आले अन त्यांनी या चित्रपटाला डोक्‍यावर घेतले.

प्रा. परिमल अणि सुकुमार सिन्हा ही पात्रे धर्मेंद्र आणि बच्चन यांनी रंगवली. यातले परिमल हे बॉटनीचे अर्थात घासपुसचे डाक्‍टर. ते त्यांच्या एका विद्यार्थीनीच्या सुलेखा (शर्मिला टागोर) प्रेमात पडतात. सुलेखा मुंबईला येते. तिच्या जीजाजींनी (ओप्रकाश) तिच्या पतीला पाहिले नसते. दरम्यान, त्यांना शुध्द हिंदी बोलण्याच्या नव्या वेडाने पछाडलेले असते आणि खायेला- पियेला असे न बोलता स्वच्छ हिंदी बोलणारा वाहनचालक हवा असतो.

डॉ. परिमल त्रिपाठी उर्फ प्यारे मोहन यांची जिजाजींच्या घरात एन्ट्री होते. तसेच त्यांच्या मित्राच्या बहिणीच्या आयुष्यात ते सुकमार याची एन्ट्री घडवून आणतात. मित्राची बहिण वसुधा (जया भादुरी) परिमल त्रिपाठीची फॅन असते. मात्र परिमल यांचा तिला सुकुमारच्या प्रेमात पाडण्याचा प्लॅन असतो.

चित्रपटसृष्टीतील सगळे महारथी या चित्रपटात होते. अभिनयाचे उच्च मानदंड प्रस्थापित करणाऱ्या सगळ्या कलाकारांना सोबत घेत हृषिदांनी हा चित्रपट काढला. चित्रपट कसला धमालच ती…

आज 45 वर्षानंतरही तो चित्रपट पाहिला तर त्यातील एकही फ्रेम कंटाळवाणी वाटत नाही. उलट उदास मनाला प्रफुल्लित करणारा विनोद तणाव नाहीसा करून कामाला लागण्यासच प्रेरीत करतो. या चित्रपटाचा ताजेपणा हे त्याचे मोठे यश आहे.

मुखर्जींच्या चुपके चुपके ने बहुदा शोले एवढे व्यावसायिक यश मिळवले नसावे कदाचित. मात्र धर्मेंद्र- बच्चन जोडीचा शोले ज्यांनी पाहिला असेल त्यांनी चुपके चुपकेही पाहिला असणार. दोन भिन्न जातकुळीचे चित्रपट असूनही त्यांना चुपके चुपकेही तितकाच भावला असणार.

उपेंद्रनाथ गांगुली यांच्या छदाभेषी या कथेवर छदमबेषी हा बंगाली चित्रपट आला होता. त्याचाच हिंदीत चुपके चुपके रिमेक होता. गुलजार यांनी पटकथेला हातभार लावला होता अन संवादही त्यांनी व शकील चंद्रा यांनी लिहिले होते.

एखाद्या बाबीच्या अतिपरिपूर्णतेचा आग्रह धरल्यावर मूळ हेतू बाजूला पडत तो एकुणच प्रकार कसा हास्यास्पद ठरतो हे या चित्रपटात प्रामाणिकपणे मांडण्यात आले आहे. जिजाजींचा शुध्द हिंदीचा आग्रह प्यारेच्या अतिशुध्दतेमुळे कसा त्यांची डोकेदुखी ठरतो हे पाहताना केवळ हास्याचे फवारेच उडतात.

भाषा हवी तशी वाकवता येते. यात तिची अवमानना नसते, तर ते तिचे सौंदर्य असते. हिंदी आपली भाषा आहे. मात्र आपण तिला बोली भाषा केल्यावर कसे अनावश्‍यक आणि चुकीचे शब्द सहजपणे स्विकारले आहेत यावरही या चित्रपटात प्रकाश पडतो. तसेच त्यातून करमणूक होउन आपल्या चुकाही समजतात.

हृषिदा भाग्यशाली म्हणायचे. कारण हल्ली एखाद्या चित्रपटात, गाण्यात अथवा संवादातून आपल्याला हवा तो अर्थ काढून घेणारे अथवा संबंधित गाण्याचा अथवा संवादाचा हेतूच समजून न घेता, आपल्या भाषेवर, जातीवर हल्ला झाल्याचा गदारोळ करत बंदीची मागणी करणारे अनेक असतात. सध्या वातावरण इतके संवदनशील झाले आहे. मात्र चुपके चुपकेच्या वेळी तसे झाले नव्हते. या चित्रपटात हिंदी भाषेची टवाळी केली असल्याचा आरोप करत तेव्हा रान माजवता आले असते. मात्र प्रेक्षकांनी तसे केले नाही. कारण दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे, याचा त्यांनीही विचार केला. ते समजून घेतले. त्याला दिलखुलास दादही दिली.

दिग्दर्शकानेही चित्रपटात कोणत्या भाषेची गंमत करण्याचा आपला हेतू नसल्याचे विनयाने आणि प्रामाणिकपणे सांगत आपली सभ्यताच अधोरेखित केली.

(क्रमश:)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.