दिग्दर्शक साजिद खान हा मला भावासारखा आहे त्याच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले असल्याचे म्हणत चंकी पांडेहा मी टुच्या आरोपांमुळे मनोरंजन विश्वातून बाहेर फेकल्या गेलेल्या साजिद खानच्या मदतीला धावून आला आहे.
“तो मी टुचा हंगाम होता आणि त्यामुळे अनेकांची पितळ उघडी पडली. मी साजिदला बालपणापासून ओळखतो. त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे मलाही धक्का बसला आहे. साजिद हा स्पष्टवक्ता आहे आणि लोकांमध्ये त्याच्याविषयी गैरसमज आहेत’, असेही चंकी पांडेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले.
बॉलिवूडमध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये मी टु मोहीम सुरू झाली. या मोहिमेअंर्तगत अनेक महिला पुढे आल्या आणि बॉलिवूडमध्ये होत असलेल्या लैंगिक अत्याचार, गैरवर्तणुकीवर त्यांनी आवाज उठवला. या मोहिमेत साजिद खानचेही नाव आले होते. अनेक महिलांनी त्याच्यावर लैगिंक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.
या आरोपानंतर “हाऊसफुल्ल 4′ च्या दिग्दर्शक पदावरून त्याची गच्छंती करण्यात आली होती. अक्षय कुमारसह अनेक कलाकारांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. मात्र साजिद हा भावासारखा आहे असे म्हणत चंकी पांडेने त्याची बाजू घेतली आहे.