कलाकृतीचं शास्त्र

आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमीच सौंदर्याला प्राधान्य देत असतो. ते मिळवण्यासाठी आपण विविध प्रकारे प्रयत्नशील असतो. ह्या सौंदर्याची व्याख्या करणं शक्‍य असलं तरीही त्याची प्रचिती प्रत्येकानं स्वतंत्ररित्या अनुभवायची असते. “व्यक्ति तितक्‍या प्रकृती’, त्यामुळेच प्रत्येकाला सौंदर्याची प्रचिती निरनिराळ्या प्रकारे येत असते. जगण्यापलीकडचं जीवन जगणे, ही देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण कला आहे. आपल्या जीवन जगण्याच्या कलेतील हे सौंदर्य म्हणजे नेमके काय? ते कशासाठी आणि कसं मिळवायचं? त्यासाठी काय करावं लागतं? अशा अनेकविध प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी खरी जरूरी असते ती निरीक्षण, परीक्षण आणि समीक्षणाची. सौंदर्याचा शोध कधी संपतच नसतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अगदी जन्मापासून प्रत्येक क्षणामध्ये, बाबीमध्ये सौंदर्याचा शोध आपण घेतला पाहिजे. ह्या सौंदर्याच्या प्रचितीमुळेच आपला जीवन जगण्याचा अनुभव हटके असू शकणार आहे, ह्याची जाणीव होणं गरजेचं असतं.

कला ही विविध गोष्टीतून आपल्याला दिसून येत असते. ही कला जोपासण्याचं, तिचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं काम हे आपण प्रत्येकजण निरनिराळ्या प्रकारे करत असतो. अशा ह्या कलेचे कोणकोणते उपयोग आपल्याला होतात? त्यामुळे आपली संस्कृती कशी अबाधित राहते? ह्याची जाणीव करून घेणं गरजेचं असतं. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर ते कलेच्या विविध माध्यमातून तो आणत असतो. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, नृत्यकला, पाककला, हस्तकला अशा अनेकविध माध्यमातून साकारलेल्या कलेतून आणि मांडलेल्या अविष्कारातून नवीन पिढीपर्यंत त्याला त्याचे विचार पोहोचवता येतात. कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला. एखादी कला अवगत असल्याने त्या कलाकाराला लोकप्रियता मिळते. कला निर्माण होते, ती स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे, कला ही विविध पर्यायांच्या रुपात दिसून येत असते, साकारली जात असते. अंगी कोणतीही कला नसणं ही खरं तर उणीवच म्हणावी लागेल.

कलेची परंपरा
अगदी अलीकडच्या काळापर्यंत “कला’ ह्या शब्दाला काही एक अर्थ, मान होता. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांना राजघराण्यात, सरकारदरबारी आश्रय होता. मात्र आधुनिकीकरण झाल्यामुळे कालांतरानं परिस्थिती बदलली. अभिजात कलांना कोणी विचारेनासं झालं. अर्थात ह्याची जाणीव सर्वांना झाली असं नाही. एखाद्या कलेची साधना करणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं, असा नवीन पिढीकडून विचार केला जाऊ लागल्याचं समजतं, त्याचाच खेद वाटतो. त्यातच शिक्षणपद्धती देखील बदलली. गुरु शिष्य परंपरेनं मैत्रीच्या नात्याची जागा घेतली. मरगळलेल्या वाटेवरून जाणं श्रेयस्कर ठरून योग्य वाटू लागलं. त्यामुळेच चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यातच धन्यता मानणारी पिढी निर्माण झाली आणि कलेचा आनंद घेणं म्हणजे काय? हेच आपण विसरून गेलो. त्याची जाणीवच आपल्याला होईनाशी झाली. कलेमुळे जीवन समृद्ध होतं, ही कल्पनाच मागे पडत गेल्याचं आपण प्रत्येकजण अनुभवत आहोत. त्यासाठी भारतीय कलेची सर्वांगीण चर्चा करताना इतिहासातील महत्त्वाच्या स्थित्यंतरांचा मागोवा घेणं आवश्‍यक असतं.

प्राचीन भारतीय संस्कृती आजच्या इतकी प्रादेशिक आणि राजकीय सीमांनी बांधली गेलेली नव्हती. आजच्या भारतीय उपखंडाबरोबर पूर्व-पश्‍चिम आणि उत्तर-दक्षिण परिसरात फार दूरवर तिचा प्रभाव कालपरत्वे कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असल्याची इतिहासात नोंद असल्याची सापडते. वंशविविधता आणि विविध धर्मश्रद्धा यांनी ती समृद्ध असल्याचं आपण विसरून चालणार नाही. संघर्ष पोटात सामावून घेत अभिसरण साधण्याची तिची ताकद विलक्षण आहे. जगण्यापलीकडील जीवनाच्या आदिम अवस्थेपासून आजवर तिची कित्येक संस्करणे होत प्रस्थापित संस्कृती म्हणून तिने विविध रूपे घेतली असल्याची साक्ष आपल्याला इतिहासात सापडते. प्रत्येक नव्या अवस्थेत आदिमतेशी नवे नातेसंबंध जुळविले असल्याचं आपण अनुभवतो. आजही हे आदिम जीवन आदिवासी पातळीवर चालू आहे. लोकशाही जीवनपद्धतीमुळे त्याचे आजच्या प्रस्थापितांशी अंतिम अभिसरण होत आहे.

आधुनिक भारतावर पाश्‍चिमात्य वैज्ञानिक संस्कृतीचा प्रभाव पडलेला असल्याचं स्पष्ट होत असलं, तरीही ह्या सर्वांचं भान ठेवून भारतीय कलेचा सातत्यानं, साकल्यानं, प्राधान्यानं आपल्याला विचार करावा लागण्याची जाणीव होणं जरुरीचं आहे. शिवाय कलाविष्कारात “आशय’ म्हणून समाविष्ट असलेले “सांस्कृतिक सारतत्व’ आणि मूळ “कलातत्त्व’ ह्या दोन भिन्न बाबी असतात; ह्याचं भानही जागतं ठेवावं लागेल. आंतराष्ट्रीय पातळीवर इतर देश, संस्कृती यांच्या कलेहून भिन्न अशी कोणती गुणवैशिष्ट्ये भारतीय कलेमध्ये आहेत; कलेतील भारतीयता म्हणजे काय? हे नवीन पिढीला त्यांच्यातील उणिवा दूर करण्यासाठी समजावून देण्याची गरज आहे. प्रत्येक कलेतील प्राणभूत अशा आकृतिप्रधान सौंदर्यतत्त्वाचं भान ठेवून आशय माध्यमाकृती सौंदर्य कसं शोधायचं ह्याची जाणीव त्यांना करून देणं आवश्‍यक आहे. विशेषतः भारतीय संस्कृतीचे असे कोणते गुणविशेष भारतीय कलेमध्ये अनन्य सौंदर्याकृतीत उतरताना आढळतात हे समजून घेणेही जरुरीचं आहे.

कलाकृतीचं महत्त्व
इ. स. पूर्व तिसऱ्या सहस्रकातील मोहें-जो-दडो, हडप्पा ह्या सिंधू संस्कृतीच्या कलेपासून भारतीय दृश्‍य कलांची सुरुवात होत असल्याची इतिहासात नोंद आहे. परंतु भारतीय विशेष कलाशैलींची सुरुवात इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील मौर्य काळापासून होत असल्याचे देखील दाखले सापडतात. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी ही कला निर्माण झाल्याचं म्हंटलं जातं. ब्राह्मणी मानल्या गेलेल्या हिंदू कलाविष्कारांचा उद्गम त्याबरोबर अहमहिकेने झालेला दिसून येतो. तेव्हापासून तहत मोगल आणि नंतरच्या संस्थानिक लघुचित्रशैलीपर्यंत परंपराप्राप्त भारतीय दृश्‍य कलांना नवनवे बहर येत राहिल्याचं म्हंटलं जातं. मूर्तिपूजेच्या प्रभावातून निपजलेली ही कला वैदिक तत्त्वज्ञानाचा वारसा सांगत असल्याचं स्पष्ट होतं. भारतीय संगीताचे मूळसुद्धा सामवेदिक संगीतात आहे, असं मानलं जातं. अनादी काळापासून महत्त्व प्राप्त झालेल्या कलेचा इतिहास खूपच मोठा आणि अनाकलनीय आहे. त्यामुळेच अनंत काळापर्यंत कलाकृतींचं महत्त्व अबाधित राहिलं आहे. त्या कलांचा वारसा पुढे चालवण्याचं आपलं कर्तव्य असल्याची सतत आपल्याला जाणीव होत राहिली पाहिजे. नवीन पिढीच्या उणिवा दूर करण्यासाठी ह्या कलांचाच वापर करून त्यांना नेणीवेपर्यंत घेऊन जाणं शक्‍य होऊ शकेल.

कलाकृती साकारणारा कलाकार
जगण्यापलीकडच्या जीवनाचा अनुभव दृश्‍य कलांमधून अभिव्यक्त होण्यासाठी विश्‍वातील दृश्‍य वस्तूंना आपल्या मनात प्रथम अनुभवत्व येऊन त्यांचं मनःप्रतिमांमध्ये रूपांतर व्हावं लागतं. प्रत्येक कलावंत आणि संस्कृती यांच्या मनोभूमिकेनुसार हे अनुभवरूप वेगवेगळे असल्याचं समजून घेतलं पाहिजे. भारतीयांच्या विचारधारेनुसार विश्‍वातील ब्रह्मस्वरूप चैतन्य जडाचे अशाश्‍वत रूप घेऊन इंद्रियगोचर होतं. केवळ चैतन्य हेच अंतिम सत्य असल्याचं मानलं जातं. इंद्रियगोचर विश्‍व हे त्याचे बाह्यरूप अथवा प्रकृती किंवा माया असल्याचं देखील म्हटलं जातं. म्हणूनच भारतीय कलेतील वास्तवता, ही पाश्‍चात्य प्रबोधनाप्रमाणे बाह्यविश्‍वातील वस्तूच्या निव्वळ गणिती मोजमापनातून निष्पन्न होणारी वास्तवता नसते; तर भारतीय तत्त्वज्ञानातील द्रष्टा-दृश्‍य-दर्शन ह्या त्रयीनुसार संवेदनक्षम द्रष्ट्याला दृश्‍याचं झालेलं दर्शन असतं. ते निव्वळ वस्तूंचं वस्तुनिष्ठ दर्शन नसतं; तर वस्तुमात्रात सळसळणाऱ्या केवळ चैतन्याचं मनोमय दर्शन असतं. ह्याची जाणीव आपल्या प्रत्येकानं करून घेतली पाहिजे.

कलेची शास्त्रीय बैठक
प्रत्येक कलेला आपापलं शास्त्र असल्याचं आपण समजून घ्यायला पाहिजे. गायन ही कला आहे; परंतु त्याची सुरुवातच शास्त्रीय संगीतानं होते. ख्याल, धृपद, धमार, टप्पा, ठुमरी, भजन, गजल असे काही महत्त्वाचे गायन प्रकार प्रचलित असल्याचं आपल्याला माहीत आहेच. नृत्य ही देखील कला आहे; तरीही भरतनाट्यम, कथक, कथकली, कुचिपुड़ी, मणिपुरी, ओडिसी, मोहिनीअट्टम हे सर्वच शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत. अलीकडच्या काळात एकूणच अंधानुकरण आणि पाश्‍चात्यांच्या सांगीतिक संस्कृतीचा आपल्या नवीन पिढीवर असलेला पगडा ह्यामुळे गायन, नृत्य अशा कलेच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व लोप पावत चाललं आहे, ही खेदाची बाब आहे. चित्रकलेच्या बाबतीत देखील साकारलेलं चित्र मॉडर्न आर्टच्या नावाखाली विचित्र असल्याची जाणीवच ह्या नवीन पिढीला होत नसल्याचं अधोरेखित करावं असं वाटतं. आपल्या संकृतीचं दर्शन आपल्या कलाकृतीतून प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार होणं योग्य ठरत असून देखील, त्याची जाणीवच न होणाऱ्या कलेचं सादरीकरण करणाऱ्यांना उणीव संपन्नच म्हणावं लागेल. आपल्या देशाला कलाक्षेत्रात खूप मोठा वारसा लाभलेला असून देखील त्याची जपणूक करणं जरुरीचं का आहे? हेच सर्वप्रथम शालेय जीवनापासून शिकवलं पाहिजे, बालवयातच प्रत्येकाच्या अंतर्मनावर कोरलं गेलं पाहिजे.

कलाकृतीचं शास्त्र
आपल्या प्रत्येकाला नेहमीच काहीतरी वेगळं करायची इर्षा असते. अर्थात ती असायला देखील काहीच हरकत नाही; परंतु आपण आपल्या देशाच्या ऐतिहासिक कलांचे वारसदार आहोत ह्याचा स्वाभिमान देखील बाळगला पाहिजे. निदान आपण कलांचे वारसदार असल्याची जाणीव तरी व्हायला पाहिजे. नव्यानं जन्माला आलेली प्रत्येक पिढी ही अनुकरणप्रिय असते. कलाकृतीचं शास्त्र आणि त्याचा वारसा जर आपणच पुढे चालू ठेवला तरच पुढील पिढी देखील अनुकरणीय कृतीतून आपल्या कलेच्या संकृतीचं जतन करेल. आधी केलं आणि मगच सांगितलं, असेच विचार, वर्तन आणि व्यवहार आपण अंगीकारत असल्यावर आपल्या पुढील अनेक पिढ्या प्रत्येक कलाकृतींच्या शास्त्राचा विचार, अभ्यास आणि त्यांचं जतन केल्याशिवाय राहणार नाही. साकारण्यात येणारी प्रत्येक कलाकृती ही विकृतीचं नाही तर आपल्या संकृतीचं दर्शन घडवून कलाकृतीच्या शास्त्राची जपणूक करत राहील. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक कलांचा संबंध आपल्या मानसिक स्वास्थ्याशी असल्याचं समजून घेतलं पाहिजे. आपलं मानसिक स्वास्थ्य मिळवणे आणि ते टिकवणे हे प्रत्येक शास्त्रीयदृष्ट्या आत्मसात केलेल्या प्रत्येक कलांच्या माध्यमातून शक्‍य होत असतं. एकप्रकारे आंतरिक उर्जा त्याद्वारे आपल्याला प्राप्त होत असल्याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.