चर्च विद्युत रोषणाईने झळाळले : ख्रिस्ती बांधवांनी केली प्रार्थना
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना सांताक्लॉजचे आकर्षण
पुणे – देशभरात नाताळाचा उत्साह आहे. सजावटीच्या वस्तू, वेगवेगळ्या चवीच्या पेस्ट्रीज, कुकीज, चॉकलेटच्या असंख्य प्रकारांनी सजलेल्या, विद्युत रोषणाईने नटलेल्या बाजारपेठा आणि घरोघरी, चर्चमध्ये केली जाणारी प्रार्थना अशा उत्साही वातावरणात नाताळ सण साजरा केला जात आहे. ख्रिसमच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व चर्चेमध्ये रात्री बारा वाजता ख्रिस्ती बांधवांनी विशेष प्रार्थना केली.
“मेरी ख्रिसमस’ म्हणत विविध भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच ख्रिसमस हा सण ख्रिस्त बांधवांचा असला, तरी सर्वच धर्मीय उत्साहाने हा सण साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील ख्रिसमस सेलिब्रेशनची जय्यत तयारी दिसून येत आहे. घरोघरी ख्रिसमस ट्री लावण्यात आले असून, छोटे ड्रम, बेल, छडी, रंगीत कागदात गुंडाळलेले चौकोनी डबे, विविध प्रकारच्या माळा, ताऱ्यांच्या आकाराचे आकाशदिवे यांनी सजावट करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या चवीच्या पेस्ट्रीज, कुकीज, चॉकलेटच्या असंख्य प्रकारांनी सजलेल्या बेकरी अन् भेटवस्तूंच्या अनेक प्रकारांनी कॅम्प परिसरातील बाजारपेठांमध्ये ख्रिसमसचा माहोल तयार झाला आहे.
सोशल मीडियावर ख्रिसमस फिवर दिसून येतोय. फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर ख्रिसमस मसेज फिरत आहेत. ख्रिसमसचे संदेश, वॉलपेपरद्वारे आपल्या नातेवाईक, मित्रांना शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.