शहरातील सर्वच चर्च रोषणाईने नटले
नगर – प्रभु येशूख्रिस्ताचा जन्म अलौकिक अणि मानवाच्या उद्धाराचा संकेत देणारा असल्याने हा दिवस अत्यंत आनंदाचा मानला जातो. प्रभु येशू ही परमेश्वराने प्रिती बद्दल जगाला दिलेली अत्यंत पवित्र आणि मोठी बक्षिसी आहे.
येशू ख्रिस्ताने देखील प्रितीच्या मार्गाने जीवन जगून दाखविले. म्हणून खिस्ती जनतेचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. प्रितीच्या मार्गाने जीवन जगल्यास जगात अनिती राहणार नाही तर निती सार्वकालिक राहिल. अशा शब्दात पास्टर संजय थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नाताऴ निमित्त आयोजित ख्रिस्त जन्मोत्सावाच्या उपासनेत ते बोलत होते. या उपासना सभेचे अध्यक्ष रेव्ह्. प्रदिप मकासरे हे होते. तत्पूर्वी मध्यरात्रीची उपासना आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रा. विजया संसारे यांनी मार्गदर्शन केले. या दोन्ही सभातून विश्व कल्याणासाठी प्रभु येशूख्रिस्ताची करुणा भाकण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माप्रित्यर्थ या दोन्ही विषेश सभांचे आयोजन करण्यात आले होते.
या उभय वक्त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जीवनावरील अनेक दाखले देवून त्यांनी केलेल्या मानवाच्या उद्धाराचे ,कल्याणाच्या कार्याची माहिती दिली. रविवारी रात्री शुभ्रदेणगीची उपासना पार पडली ,या सभेतही रेव्ह.डॉ. नितीन साळवे यांनी मार्गदर्शन केले. नाताळनिमित्त शहरातील सर्वच चर्चना रोषणाई, सजावट केली असून शहरात विशेषतः ख्रिस्ती वसाहतींमधून उत्सवी वातावरण आहे. शहरातील सर्वच चर्च मधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.यात केक डेकोरेशन, संतुलित आहार थाळी ,ग्रिटींग्ज कार्ड बनविणे,कॅंप फायर ,कॅंडल लाईट उपासना ,प्रभू भोजन विधी,मध्यरात्रीची उपासना ,नववर्ष उपासना आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरालगतच्या सेंट झेविअर्स चर्च मध्येही सकाळी 6.30 वाजता आणि सकाळी 8.30 वाजताची अश्या दोन सभांचे आयोजन करण्यात आले होते.