येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा दिवस नाताळ किंवा ख्रिसमस म्हणून सर्व जगभर मोठ्या उत्साहाने पाळला जातो. येशूच्या चरित्रावरून दिसून येते की त्याचा जन्म एका सुतारकामाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात झाला. एका गरीब व सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या येशूमध्ये असे काय वैशिष्ट्ये आहे व त्याचा जन्मदिवस जगभर इतक्या आनंदाने का पाळला जातो?
पहिली व सर्वात महत्वाची गोष्ट ही की येशूचा जन्म दैवी योजनेनुसार झाला. देवाची ही योजना मानवाच्या उद्धाराची आहे. मानव हा मूलत: पापी आहे. देवाने मानवाला त्याच्याशी सहभागिता ठेवण्यासाठी निर्माण केले, पण अंत:करणातील पापामुळे मानव देवाच्या पावित्र्यासमोर उभा राहू शकला नाही व दोघांची फारकत झाली. मानवी अंत:करणातील पाप नष्ट झाल्याखेरीज देव व मानव यामधील दुरावा संपणार नव्हता.
या कारणास्तव देव स्वत: मनुष्यरूप धारण करून या जगात येशू या नावाने आला व सर्व जगाचे पाप स्वत:च्या माथी घेऊन वधस्तंभावर त्याने स्वत:चे समर्पण केले. येशूने केलेल्या मध्यस्थीमुळे पवित्र देव व पापी मानव यामधील सहभागिता पुनरपि प्रस्थापित झाली.
येशूचा जन्मदिवस म्हणजे मानवी जीवनात देवाने केलेला पहिला हस्तक्षेप आहे. येशूचा जन्म होण्यापूर्वीच त्याचे येशू हे नाव निश्चित केले. त्याच्या जन्माच्या वेळी आकाशात एक प्रखर तारा चमकू लागला. त्या ताऱ्याकडे पाहून पूर्व दिशेकडून ज्ञानी लोक शेकडो मैलांचा प्रवास करून त्याच्या दर्शनासाठी आले. देवदूतांनी पृथ्वीवर अवतीर्ण होऊन रात्रीच्या वेळी रानात मेंढरे राखणाऱ्या मेंढपाळांना येशूच्या जन्माची बातमी सांगितली.
केवळ दैवी हस्तक्षेप झाल्यामुळेच या व इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या दिवशी घडून आल्या. जन्माप्रमाणेच येशू ख्रिस्ताचे कार्य व त्याची शिकवण हेही असामान्य आहे. येशूने कोणत्याही धर्माची स्थापना केली नाही व कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही. तो म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. जगाला देवाची कृपा व आत्मिक सत्याचे ज्ञान येशूमुळे झाले.
असा हा अद्वितिय येशू जगाचा प्रकाश म्हणून ख्रिसमसच्या दिवशी या जगात आला. त्याच्या जन्माने इसवीसन मोजण्यास सुरूवात झाली ही एकच गोष्ट त्याचे वेगळेपण सिद्ध करते. त्याची ओळख करून घेणे म्हणजेच पर्यायाने मानवाच्या तारणाची जी दैवी योजना आहे. तिची ओळख करून घेणे व तिचा स्वीकार करून देवाच्या सानिध्यातील सर्वकाळ टिकणाऱ्या जीवनात प्रवेश करणे आहे.