Chris Gayle | ख्रिस गेलचे दोन वर्षांनी राष्ट्रीय संघात पुनरागमन

जमैका –आक्रमक फलंदाज व युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल याने जवळपास दोन वर्षानंतर वेस्ट इंडिज संघात पुनरागमन केले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात टी-20 क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धा होणार आहे. याची तयारी आतापासूनच वेस्ट इंडिजने केली असून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत गेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतात होत असलेल्या या स्पर्धेत संघाकडून सरस कामगिरी व्हावी यासाठी अनुभवी गेलला संधी देण्यात आली आहे. गेल याने वयाच्या 41 व्या वर्षी वेस्ट इंडिज संघात पुनरागमन केले आहे. त्याने 2019 साली इंग्लंड विरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते.

गेल याने 2006 साली न्यूझीलंड विरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 58 आंतरराष्ट्रीय सामन्यात 32 च्या सरासरीने व 142 च्या स्ट्राईक रेटने 1627 धावा केल्या होत्या. यात दोन शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

श्रीलंकेविरुद्ध तीन मार्च ते सात मार्च या दरम्यान तीन सामन्यांची टी-20 क्रिकेट मालिका होणार आहे. त्यासाठी कॅरन पोलार्डकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून गेलच्या कामगिरीला झळाळी मिळावी यासाठी प्रत्यक्ष विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी त्याला या स्पर्धेमुळे चांगला सरावही मिळणार आहे.

वेस्ट इंडिज संघ – कॅरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फेबियन एलन, ड्‌वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्डस, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, ओबेद मॅककॉय, रोवमॅन पॉवेल, लेंनली सिमन्स, केव्हिन सिनक्‍लेअर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.