पुणे, दि. 28 -सारसबागेच्या बाहेरील बाजूस असलेल्या रस्त्यावर वॉकींग प्लाझा करण्यात येणार आहे. या ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीसाठी स्टॉल, नागरिकांना बसण्यासाठी जंगली महाराज रस्त्याच्या धर्तीवर सुविधा, खेळण्यांसाठी स्वतंत्र जागा अशा वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्राथमिक आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला असून, लवकरच तो अंतिम केला जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठीचा सर्व खर्च महापालिका प्रशासनच करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांइनी दिली.
महापालिकेने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाई करत सारसबाग चौपाटीवरील खाद्य पदार्थांचे सर्व स्टॉल सील करत स्टॉल्सच्या समोर रस्त्यावरच उभारण्यात आलेले शेड, टेबल, खुर्च्या आदी साहित्य जप्त केले होते. या ठिकाणी व्यावसायीकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली होती. यानंतर पथारी व्यावसायिक संघटनांनी यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. यावर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत सारसबाग चौपाटी येथे अतिक्रमण होऊ नये तसेच वॉकींग प्लाझा करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार आता वॉकींग प्लाझाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याबाबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यास अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे 58 व्यासायिक असून, त्यांनाही खाद्यपदार्थ स्टॉलसाठी ठरावीक जागा निश्चित करून दिली जाणार असून, अत्याधुनिक पद्धतीने स्टॉल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी फिरता येईल.