11 बाधितांमुळे चोरगेवाडी धास्तावली

मुंबईवरून आलेल्या व्यक्तीमुळे वाढली डोकेदुखी
सातारा (प्रतिनिधी) –
चोरगेवाडी, ता. सातारा येथे करोनाचा विळखा वाढत असून एकाच वेळी 11 जणांचे रिपोर्टस्‌ पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबईतून गावात आलेली व्यक्ती शनिवारी करोनाबाधित आढळली होती. तिच्या संपर्कातील 18 जणांना क्वारंटाइन करून त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यातील 11 जणांचे अहवाल शनिवारी (दि.4) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. कण्हेर धरणाशेजारी असलेल्या चोरगेवाडी या छोट्याशा गावातील एका वस्तीतील एवढे रुग्ण एकाच वेळी पॉझिटिव्ह आढळल्याने परिसर हादरला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन कडक उपायोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

चोरगेवाडीतील एक जण आठवड्यापूर्वी अनेकांच्या संपर्कात आला होती. तेथील एका मुलीचे जूनमध्ये लग्न झाले होते. त्यात त्याचा अनेकांशी संपर्क आला. परिणामी त्या वस्तीतील अनेकांना ताप व सर्दी, अशी लक्षणे असल्याने गावात करोनाबाधित वाढण्याची भीती व्यक्‍त होत होती. ती कालच्या अहवालांमुळे खरी ठरली आहे. त्यामुळे माळवाडी वस्तीच्या परिसरातील अडीच किलोमीटरचा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील दहा जणांचे संस्थात्मक व पाच जणांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य अधिकारी तेजस्विनी पाटील, विस्तार अधिकारी जितेंद्र काकडे, सरपंच लक्ष्मण गोगावले, ग्रामसेविका आर. टी. दहिफळे, तलाठी मुळीक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांनी रविवारी परिसरास भेट दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.