चोपडा : बांगलादेश सीमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बीएसएफमध्ये कार्यरत असलेला महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद झाला आहे. दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. जवान अरुण दिलीप बडगुजर असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. सोमवारी दुपारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात ही घटना घडली. 20 वर्षांपासून बडगुजर बीएसएफमध्ये कार्यरत होते. ४ महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. त्यागोदरच त्यांना वीरमरण आले.
बांगलादेशाच्या सीमेवर त्रिपुरा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. अरुण दिलीप बडगुजर हे चोपडा साईबाबा कॉलनीमधील रहिवासी होते. सोमवारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात दहशतवादी हल्ल्यात गोळी लागल्याने ते शहीद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यांचे पार्थिव मध्य प्रदेशातील इंदोर येथून बीएसएफच्या वाहनाने मूळ गावी आणले जाणार आहे. अरुण दिलीप बडगुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यंसस्कार करण्यात येणार आहे.
अरुण दिलीप बडगुजर यांना सीमेवर वीरमरण आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना समजताच त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अरुण बडगुजर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अवघ्या ४ महिन्यांनी ते निवृत्त होणार होते त्यागोदरच त्यांना वीरमरण आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.