कॉन्ट्रॅक्‍टर निवडताना…. (भाग-२)

कॉन्ट्रॅक्‍टर निवडताना…. (भाग-१)

बहुतेक बांधकामांच्या ठिकाणी किमान 5 ते 10 टक्‍के साहित्याची कळत-नकळत नासाडी होते. याबाबतीत “लेबर कॉन्ट्रॅक्‍टर’ची भूमिका मोठी. कारण त्यानं मालासाठी पैसे खर्च केलेले नसतात. त्यामुळं काळजी घेणं हे आपलं काम नसल्यासारखे तो वागतो. सहसा घरकुल बांधणाऱ्या व्यक्‍तीला साहित्याच्या दर्जाची कल्पना राहात नसल्यामुळे चांगलं आणि वाईट या दोन शब्दातील अंतर त्याला फारसं उमगत नाही. उदाहरणार्थ वाळू मातीमिश्रित राहण्याची वा कॉंक्रीटसाठी आणलेल्या खडीचा दर्जा खराब असण्याची शक्‍यता असते. परंतु या त्रुटी लगेच लक्षात येतात त्या “मटेरियल कॉन्ट्रॅक्‍टर’च्या. कारण पैसे त्याने खर्च केलेले असतात. शिवाय तो नेहमीचा ग्राहक असल्यामुळे दुकानदार त्याला फसविण्याच्या भानगडीत पडत नाही. जर एखादी वस्तू बाजारात उपलब्ध नसेल, तरी कंत्राटदार त्याच्या ओळखीमुळं साहित्य कमी पडू देणार नाही. अशा विविध प्रसंगांना तोंड दण्याची सवय घरकुल बांधणाऱ्या व्यक्‍तीला नसते. त्यामुळे ऐनवेळी त्याची तारांबळ उडून बांधकाम ठप्प होण्याचा धोका असतो.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे “लेबर कॉन्ट्रॅक्‍टर’नं बहुतेकवेळा सांगितलेले दर चौरस मीटरमध्ये असतात. तर “मटेरियल कॉन्ट्रॅक्‍टर’ उपयोग करतो तो घन मीटरचा. चौरस मीटरचं रूपांतर घन मीटरमध्ये केल्यास “लेबर कॉन्ट्रॅक्‍टर’नं सांगितलेले दर दुप्पट वा तिप्पटही होऊ शकतील. सध्या अनेक कंत्राटदार हे स्वतःच अभियंते असल्यामुळे परराज्यातून मजुरांना घेऊन आलेल्या इसमापेक्षा त्यांचं ज्ञान कित्येक पटींनी जास्त असतं.

बहुतेकवेळा “मटेरियल कॉन्ट्रॅक्‍टर’ हा त्या ठिकाणी राहणाराच असल्यामुळे तो पळून जाण्याची शक्‍यता फार कमी असते. पण मजूर पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही. घर बांधणाऱ्याकडून अगोदरच पैसे घेऊन अशी व्यक्‍ती फरारी होण्याच्या कित्येक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्याशी जरा जपूनच व्यवहार केलेला बरा. अनेकदा त्रास चुकावेत म्हणून मालक बांधकाम साहित्यासाठी त्याचंच सहाय्य घेतो. अशावेळी “लेबर कॉन्ट्रॅक्‍टर’ची नजर असते ती कमिशनवर. मालाचा दर्जा वा त्याचं प्रमाण यांचा विचार तो करत नाही.

या पार्श्‍वभूमीवर करारात काही कलमांचा समावेश करून योग्य ती काळजी घेता येईल. वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्याचा दर्जा, कुशल कामगार निवडण्याचं स्वातंत्र्य, वेगवेगळ्या उपकंत्राटदारांचा उपयोग, वगैरे गोष्टींवर भर देणे हा उत्तम मार्ग. कारण त्यामुळं बांधकामावर नजर ठेवणं घरकुलाच्या मालकाला बरंच सोपं होईल. तसा परिस्थितीत जर करार मोडण्याचा प्रयत्न कंत्राटदारानं केला, तर त्याला खडसावणं कठीण होणार नाही. अन्‌ घर देखील आखलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण होईल.

तरी देखील काही अडचणींना तोंड द्यावं लागण्याची शक्‍यता असतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बांधकाम रेंगाळण्याचा धोका. संपूर्ण बांधकामाची जबाबदारी ही एका व्यक्‍तीनं स्वीकारलेली असणं हे त्यामागचं प्रमुख कारण. शिवाय विविध साहित्य पुरविणाऱ्या माणसांना अन्‌ कामगारांना योग्य वेळी पैसे देण्यास कंत्राटदार अपयशी ठरला, तर काम पूर्ण होण्यास विलंब हा होणारच.

– आशिष जोशी 

Leave A Reply

Your email address will not be published.