नवी दिल्ली – देशभरामध्ये आज 74 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या देशात आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला.
यावेळी चित्ररथावर ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ साकारण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती पाहण्यास मिळाली. या चित्ररथासाठीचा पारंपरिक गोंधळ हा ‘कौशल इनामदार’ यांनी संगितबद्ध केला आहे. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया आकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कौशल इनामदार म्हणतात..,”महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित गोंधळाला मी संगीतबद्ध केले. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. माझे मित्र आणि सहकारी अमित पाध्ये, अनिल करंजवकर, सिद्धेश जाधव, नंदेश उमप, गायिका अमृता खोडके-दहिवेलकर, प्रगती जोशी, मधुरा परांजपे आणि विवेक कांबळी यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो.” या आशयाची पोस्ट त्यांनी लिहली आहे.