लखनौ – चित्रकूट सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच लखनौच्या विशेष न्यायालयाने गायत्री प्रजापतीला दोषी ठरवले होते. त्याचवेळी पुराव्याअभावी 4 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रजापती यांच्या शिक्षेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माजी मंत्री गायत्री प्रजापती, आशिष शुक्ला आणि अशोक तिवारी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर गायत्री प्रजापतीला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
-काम मिळवून देण्याच्या बहाण्याने वारंवार सामूहिक बलात्कार
फिर्यादीनुसार, चित्रकूट येथील पीडित महिलेने 18 फेब्रुवारी 2017 रोजी लखनऊमधील गौतम पल्ली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. महिलेचा आरोप आहे की, खाणकामाचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने गायत्री प्रजापती आणि इतर आरोपींनी महिलेला लखनौला बोलावले. यानंतर त्यांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. तसेच तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत म्हंटले होते.
– डीजीपींनी ऐकून घेतली नव्हती तक्रार
याबाबत महिलेने उत्तर प्रदेशच्या डीजीपींकडे लेखी तक्रारही केली होती, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, 18 फेब्रुवारी 2017 रोजी गायत्री प्रजापती आणि उर्वरित आरोपींविरुद्ध लखनऊच्या गौतम पल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
– अखिलेश सरकारमधील मंत्री
जेंव्हा प्रजापती यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी ते उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. यापूर्वी ते राज्य सरकारमध्ये खाण मंत्री होते, त्यात कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांच्या घरावर आणि जागेवर छापे टाकले होते.