मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केलेल्या टीकेला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बारामतीचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिले आहे.
‘भाजपा आता पक्ष राहिला नसून लॉन्ड्री झाली आहे’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ यांनी “२०२४ साठी आपल्या लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या…A for Amethi, B for Baramati..” असे ट्वीट केले आहे.
भाजपची काळजी सोडा सुप्रियाताई…
२०२४ साठी आपल्या लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या…
A for Amethi
B for Baramati… @supriya_sule @nsitharaman pic.twitter.com/kqDIghgMDE— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 17, 2022
रविवारी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात घेण्यावरून टोला लगावला होता.
“आधी भाजपा पक्ष होता. पण आता भाजपा पक्ष राहिला नसून लॉन्ड्री झाली आहे. भाजपामध्ये जिकडे तिकडे इतर पक्षातून आलेले नेते दिसतात. ज्यांनी भाजपाला वाढवलं ते खरे कार्यकर्ते आज कुठे आहेत?” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.