Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसचे बंडखोर राजू लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नसल्याने मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. आता येथे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने पक्षाला धक्का मानला जात आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यात उघड नाराजी पाहायला मिळाली. यावरून भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे.
कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतली. मधुरिमाराजे या छत्रपतींची सून असूनही त्यांचा जाहीररित्या अपमान करण्यात आला, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. यावरुन चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांना टोलाही लगावा. तुमच्या सोबत कोणी काय केलं तुमची कोणी घंटी वाजवली ते बंटी भाऊंनी शोधावे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या,’छत्रपतींच्या सुनबाईचा ज्या पद्धतीने त्यांच्या घरातल्यांनी पण आणि या बंटी पाटील ज्या पद्धतीने त्यांचा जे वागले, जो पाणउतारा केला तो मनाला त्रासदायक होता. आमच्या सगळ्यांसाठी वेदनादायी होता. सर्वसामान्य घरातली बाई पण म्हणत होती आमच्या नवऱ्याची पण अशी हिम्मत नाही आम्हाला असा हात धरून खेचून आणायची. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली गेली, ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागलं गेलं मी मगाशीच म्हटलं राजकीय कार्यकर्ता म्हणून सोडून द्या पण एक बाई म्हणून मला अतिशय वेदनादायी वाटलं.असेही त्या म्हणाल्या आहे.