नवी दिल्ली – भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून चित्रा वाघ यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांना धरून टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहे. दुसरीकडे विजया रहाटकर यांचे नाव यादीतून वगळण्यात आले असून नारायण राणे यांनाही डावलण्यात आले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 80 सदस्य आहेत तर 50 विशेष निमंत्रित आणि 179 पदाधिकारी आहेत ज्यात मुख्यमंत्री, प्रभारी आदींचा समावेश आहे. आधीच्या कार्यकारिणीत असलले वरुण गांधी, मेनका गांधी, चौधरी विरेंद्र सिंह यांना नव्या यादीतून वगळले आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांची थेट राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्ण लागलीय. तर पीयुष गोयल, नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे इतर कॅबिनेट मंत्री कार्यकारिणीत असताना नारायण राणे यांना मात्र कार्यकारिणीत स्थान दिलेले नाही.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयुष गोयल, प्रकाश जावडकेर, विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर हे आधीप्रमाणे याही कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्री म्हणून कायम. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे विधानसभा, विधानपरिषदेचे गटनेतेही कार्यकारिणीवर आहेत. महाराष्ट्रातून आशिष शेलार, सुधीर मुनंगटीवार, लड्डाराम नागवानी हे विशेष आमंत्रित आहेत. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून 26 जणांच्या यादीत महाराष्ट्रातल्या हीना गावित एकमेव आहेत.