शिरवळ – शिरवळ (ता. खंडाळा) येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 23 तोळे सोने तसेच 22 हजार रुपये रोख रकमेसह 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
अधिक माहिती अशी, शिरवळ येथील शिर्के कॉलनी याठिकाणी श्रीदेवी राहुल राठोड या कुटुंबियांसमवेत राहण्यास आहे. शनिवार 13 जुलै रोजी पुतणी आरोही हिच्या शाळेला सुट्टी असल्याने पुणे येथे नातेवाईकांकडे त्या गेल्या होत्या.
दरम्यान, रविवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 9.15 वाजण्याच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या मेघा कांबळे यांनी श्रीदेवी राठोड यांना फोन करत घराचे दार उघडे असल्याचे सांगितले. यावेळी श्रीदेवी राठोड या तात्काळ पुण्याहून घरी आल्या असता घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले तर कपाटातील लॉकरमधील 90 हजार रुपये किंमतीचे साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण, 70 हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 40 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 50 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 40 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 10 हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाचे एक मणिमंगळसूत्र, 40 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन, 30 हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे कानातील झुबे, 10 हजार रुपये किंमतीचा कानातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची वेल, 20 हजार रुपये किंमतीच्या एक जोडी
कानातील एक तोळे वजनाच्या सोन्याच्या रिंग, 20 हजार रुपये किंमतीच्या एक तोळा वजनाच्या दोन अंगठ्या 8 हजार रुपये किमतीच्या दोन ग्राम वजनाच्या एक तोळा वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, 9 हजार रुपये किमतीच्या तीन चांदीच्या पट्ट्यांचे जोड व 22 हजार रुपये रोख रक्कम असा 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. घटनास्थळी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी सुहास गरुड, शिरवळ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांनी व सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) च्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची फिर्याद श्रीदेवी राठोड यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.